
फलटण : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना लोकप्रतिनिधींसह समाजातील नागरिकांनी आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा येथील सैनिक स्कूलच्या सभागृहात पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समारंभात ‘कारगिल विजय दिवस’ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सैनिक स्कूलचे प्राचार्य के. श्रीनिवासन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे, जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, निवृत्त कर्नल आर.जे. कांबळे, शंकर माळवदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने शत्रू राष्ट्राला चांगला धडा शिकवला, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, शत्रू राष्ट्राला एक इंचही जागा भारतीय सैन्य दलाने घेऊ दिली नाही, याद्वारे आपल्या सैन्याने आपले शौर्य आणि बलिदान पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. त्यांच्या पराक्रम व शौर्यामुळे आपण निर्धास्तपणे राहत आहोत. भारतीय सैन्य दलातील आजी माजी सैनिकांना आपण नेहमीच मान, सन्मान दिला पाहिजे. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक योजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मुलांसाठी वसतिगृह, माजी सैनिकांसाठी विश्रामगृह उभारणी या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून प्रथम करण्यात येणार आहे. यासाठी उद्योगांकडील सीएसआर फंड सामाजिक बांधीलकी म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. जनता दबाराच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले. त्यांना एक प्रकारे आधार देण्याचे कामही या माध्यमातून करण्यात येत आहे. समाजातील प्रत्येकाने सामाजिक बांधीलकी म्हणून त्यांच्या कार्याची त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील कारगिल युध्दामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच या युध्दामध्ये दिव्यांगत्व आलेल्या आणि शौर्य पुरस्कारधारक यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांनी कारगिल युद्धातील सहभागाच्या आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमास वीरपत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक आणि माजी सैनिकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
