
फलटण : ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे ब्रीद वाक्य केवळ बोलण्यापुरते न घेता, ते कृतीमध्ये उतरविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. लक्ष्मीतरू वृक्ष मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन फलटण तालुक्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र या वृक्षाची लागवड झाली पाहिजे अशी अपेक्षा आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केली.
साखरवाडी विद्यालय, साखरवाडी ता. फलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘एक विद्यार्थी एक वृक्ष अभियान’ अंतर्गत ६६ हजार लक्ष्मीतरू रोपांचे रोपण करण्याच्या संकल्पाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते डी.के. पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सागर कांबळे, डॉ.माधवराव पोळ, प्रभाकर जगताप, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रतिभा शिंदे, विक्रम भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत झाडांची संख्या कमी झाल्याने, त्याचा परिणाम जसा पर्यावरण वर होत आहे, त्याच पद्धतीने मानवी आरोग्यावर देखील होत आहे. वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. फलटण तालुक्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणचा समतोल साधला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून अगामी काळात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येईल. आपला फलटण तालुका सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने सर्वच वर्गातील लोकांनी पुढे यायला हवे असे आवाहनही आमदार सचिन पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास राजेंद्र शेवाळे, निवृत्ती खताळ, राजाभाऊ पवार, डॉ.ओंकार सरगर आदींसह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

