
फलटण : सातारा जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी अपघात प्रवण रस्त्यांचे सर्व्हेक्षण पोलीस, सार्वजनिक बांधकाम व प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यायालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, उप पोलीस अधीक्षक अतुल सबणीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात सहा ब्लॅक स्पॉट असून याशिवाय संवेदनशील अपघातप्रवण असणाऱ्या क्षेत्रांची संयुक्त पाहणे करावी असे सांगून, पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते तात्काळ मुजवावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी माने यांनी दिले. ते म्हणाले, अपघातात डोक्याला होणारी गंभीर इजा टाळण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करावी. यासाठी प्रत्येक विभागाने परिपत्रक काढावे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
