कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटणमध्ये अत्याधुनिक एआय प्रयोगशाळा उभारणार : संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण आणि पुणे येथील नामांकित एआय ऑटोमेशन प्रा. लि. यांच्यात आज पुण्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार संपन्न झाला. या कराराअंतर्गत फलटण येथील महाविद्यालयात अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रयोगशाळा उभारली जाणार असून, या प्रयोगशाळेचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच फलटण परिसरातील शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याचे प्रतिपादन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
या करारासाठी आयोजित कार्यक्रमात एआय ऑटोमेशनचे मुख्यकार्यकारी अधिकारी भूषण मुधियन, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, एआय अँड डीएस विभागप्रमुख प्रा. अमित भोसले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. गोविंद ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाविषयी बोलताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी मैलाचा दगड आहे. एआय ऑटोमेशन सोबतच्या करारामुळे आमच्या विद्यार्थ्यांना एआय, एमएल, डेटा सायन्स, एनपीएल, रोबोटिक्स यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण मिळणार आहे. त्या मुळे केवळ शैक्षणिक कौशल्यच नव्हे तर इंडस्ट्री ओरिएंटेड स्किल्सही विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतील.
एआय ऑटोमेशनचे मुख्यकार्यकारी अधिकारी भूषण मुधियन यांनीही सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, ग्रामीण भागात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या आमच्या उद्दिष्टाला आज दिशा मिळाली आहे. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहोत, जे त्यांना करिअरमध्ये स्पर्धात्मक बनवेल. या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांच्याही अनेक अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. पिकांवरील रोग, कीड, माती परीक्षण, हवामान विश्लेषण यासाठी AI आधारित समाधान उपलब्ध होणार आहे. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन पिक संगोपन करुन उत्पादनात वाढ करू शकतील. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीलाही याचा थेट फायदा होणार असून, शेतमाल व्यवस्थापन व वितरण प्रक्रियेत नवे तंत्र लागू करता येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी नव्या संधी उपलब्ध होणार असून, कॅम्पस प्लेसमेंटसाठीही उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांच्या आधारे कंपन्यांमध्ये थेट रोजगार मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
हा सामंजस्य करार म्हणजे फक्त प्रयोगशाळा उभारण्यापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाची दिशा आहे. त्यामुळे ही भागीदारी भविष्यात अनेक नवे प्रयोग, संशोधन, स्टार्टअप्स व ग्रामीण भागातील समस्यांवर आधारित तंत्रनियंत्रित उपायांचा पाया ठरेल, असा विश्वास यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केला.

“एआय प्रयोगशाळेमुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनही सुलभ होणार आहे. शिक्षणासोबतच समाजातील प्रश्न सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

या प्रयोगशाळेचा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीलाही लाभ होईल. संस्थेचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, विभागप्रमुख व सर्व प्राध्यापकांचेही यामध्ये महत्वपूर्ण योगदान असून ही प्रयोगशाळा केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे तर फलटणसाठीही अभिमानाचे पाऊल आहे. अशी प्रतिक्रिया फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!