
फलटण : येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषि महाविद्यालय, फलटण येथील बी.एस.सी. (कृषी) पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत गावरान कोंबडी कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
प्रशिक्षणामध्ये शास्त्रीय पद्धतीने कुक्कुटपालन करणे, त्यासाठी आवश्यक साहित्य, अल्प खर्चात पक्षांची शेड उभारणी, पक्षांचे खाद्य पाण्याची व्यवस्था, पक्ष्यांचे लसीकरणाचे नियोजन, शेडमध्ये आवश्यक स्वच्छता, पक्षांसाठी लाईटची व्यवस्था, कोंबडखत व्यवस्थापन तसेच जमाखर्च व ताळेबंद, व्यवसाय करताना येणाऱ्या विविध अडचणी व त्यांचे निराकरण करणे अशा विविध बाबींवर सखोल माहिती व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. अशाप्रकारे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गावरान कुक्कुटपालनाचे परिपूर्ण व्यावसायिक तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे व विद्यार्थ्यांना भविष्यात स्वावलंबी कृषी उद्योजक व्हावे हा यामागील हेतू आहे. सदरील व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. वाय. लाळगे, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
