
फलटण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील फलटण आगाराने श्रावण मासाचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन भाविक व नागरिकांना धार्मिक स्थळांना सहज व सुलभपणे भेटी देता याव्यात या करिता शुक्रवार, दि. २५ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावण मासानिमित्त भक्तांसाठी विविध धार्मिक स्थळांवर श्रावण मास तीर्थयात्रा दर्शनची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
भाविकांना श्रावण मासात धार्मिक स्थळांना सहज सुलभ भेट देऊन दर्शन, सेवा, पूजेचा लाभ घेता यावा या साठी विविध धार्मिक स्थळ दर्शन यात्रा बसेसचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये अक्कलकोट-तुळजापूर-पंढरपूर दर्शन, अष्टविनायक दर्शन, कोल्हापूर-आदमापूर-जोतिबा दर्शन, शनि शिंगणापूर-शिर्डी दर्शन, थेऊर-भीमाशंकर दर्शन, साडेतीन शक्तिपीठ दर्शन, परळी वैजनाथ-औंढा नागनाथ-शेगाव दर्शन अशा विशेष तीर्थयात्रा दर्शन बसचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दर्शन बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यात ५० टक्के, महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील वृद्ध स्त्री – पुरुषांना संपूर्ण प्रवास भाडे माफ असणार आहे. शुक्रवार, दि. २५ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावण मासानिमित्त भक्तांसाठी विविध तीर्थस्थळांच्या ठिकाणी दर्शन सहली आयोजित केल्या आहेत. सर्व भाविक प्रवासी बंधू भगिनींनी या सेवेचा लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसनेच प्रवास करावा असे आवाहन फलटण आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे ९६३७२१२२९६, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शुभम रणवरे ९९६०८०९३६२, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे ९५२७८३१२६२, वाहतूक निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी ९०२९ ३५७८१०, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे ९८५०८०२४८०, सहाय्यक धीरज वाहतूक निरीक्षक अहिवळे ७७५७८८६७८६, वाहतूक नियंत्रक ग्रुप बुकिंग प्रमोद साळुंखे ९१५८७३५१५१ यांच्याशी सदर मोबाईल नंबरवर श्रावण मास तीर्थदर्शन बस योजनेच्या अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

