
फलटण : गरोदर माता व स्तनदा माता आणि अंगणवाडी बालकांना सकस पोषक आहार हा त्यांचा अधिकार आहे. वित्त आयोग आणि ग्रामपंचायत निधीमधून गावातील स्तनदा माता, गरोदर माता आणि अंगणवाड्यातील मुलांना अतिरिक्त पोषण आहार देऊन त्यांच्या शरीरातील ऊर्जा तयार करणे, कुपोषण नाहीसे करणे, नवजात बालक सुदृढ होण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजाळे ता. फलटण येथील हनुमान मंदिर येथे वित्त आयोग आणि ग्रामपंचायत निधीमधून स्तनदा व गरोदर माता, अंगणवाडी बालके यांना विविध प्रथिनेयुक्त पोषण आहार किटचे वाटप आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, तुकाराम शिंदे, राजाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. महिपाल, युवराज सस्ते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास राजाळे गावातील महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
