आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक : देवेंद्र भुजबळ

फलटण : आपल्याला खरा आनंद कशात मिळतो याचा शोध घेऊन आनंद मिळवा. पण आपला आनंद दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनणार नाही याची काळजी घ्या. आपल्या आनंदाचे व्यसनात रूपांतर होणार नाही, यासाठी जीवनात समतोल साधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले.
नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या “आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.
एखाद्या व्यसनामधून आनंद मिळतो म्हणून जर कोणी २४ तास, ३६५ दिवस तेच व्यसन करत राहिली तर ते योग्य ठरणार नाही. आपल्या आरोग्याचा, घरच्यांचाही विचार संबंधिताने केला पाहिजे असे स्पष्ट करून भुजबळ म्हणाले, नोकरी, व्यवसाय करीत असतानाचे आयुष्य आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, पूर्वी आपण कामात आणि अन्य प्रकारच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त रहात असल्याने वेळ कसा जाई हे कळतही नसे. पण निवृत्तीनंतर रिकाम्या वेळेचे काय करायचे ? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काही छंद असल्यास ते जोपासणे, नसल्यास काही छंद निर्माण करणे, सामाजिक कार्यात भाग घेणे ,अशा पद्धतीने आपला वेळ कारणी लावून सकारात्मक मानसिकता ठेवावी.

तंत्रज्ञान बदलत चाललेले असून मोबाईल हा आपला मित्रही आहे आणि शत्रूही आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण कसा करायचा हे ठरवले पाहिजे. मन मोकळं करण्यासाठी खास मित्र असावेत, त्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. आपल्याजवळ जी काय संपत्ती आहे, त्यामध्ये समाधान माना. अधिक संपत्ती मिळवण्याच्या पाठीमागे लागू नका. भारतात नवी मुंबई सायबर क्राईममध्ये एक नंबरवर आहे. समाजामध्ये वागत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख वाटण्याने कमी होते, परंतु आनंद वाटण्याने वाढत जातो. नेहमी दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच भरपूर आनंद मिळेल असेही भुजबळ यावेळी म्हणाले. इंग्लंडमध्ये सात वर्षे आणि भारतात तीन वर्षे संशोधन करून मधुमेह तज्ञ डॉ. विनायक हिंगणे यांनी “क्रेव्हिंग : खाण्याचे व्यसन” असे पुस्तक लिहिले असून शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाणे हे देखील एक व्यसन आहे, हे सिद्ध केले आहे. त्यामुळे आपल्या शरीराला गरज आहे तेवढाच आहार घ्यावा. त्यापेक्षा जास्त आहार घेऊ नये. तसेच योग्य आहाराबरोबर झेपेल तसा व्यायाम, चालणे, योगा, ध्यानधारणा ,पुरेशी विश्रांती, निकोप नाते संबंध, छंद याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या वाट्याला दुःख येऊ देऊ नये, हे देखील आनंदी जीवनासाठी आवश्यक असल्याने अधिक मोबदला देणाऱ्या फसव्या जाहिराती आणि अन्य आमिषे याला बळी पडू नये. आपली आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक, भौतिक प्रगती प्रचंड होत चालली आहे. परंतु दुर्दैवाने आपली सामाजिक, भावनिक व मानसिक प्रगती अद्याप झालेली नाही. सत्ता संपत्ती आहे, परंतु मानसिक शांतता नाही. नातेसंबंध बिघडत चाललेले आहेत. समाजात काय घडते, आपण कुठे चाललो, या सर्व घटना अस्वस्थ करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण मनाचा समतोल राखणं गरजेचे आहे असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी प्रमुख वक्ते देवेंद्र भुजबळ यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव शरद पाटील यांनी केले. तर आभार संघाचे पदाधिकारी बळवंतराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमास संघाचे सर्व पदाधिकारी, इतर मान्यवर, ज्येष्ठ पुरुष व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!