
फलटण : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याचा जागतिकतेला औपचारिक स्वरूपात प्रतिष्ठा लाभली आहे. हा गौरव संपूर्ण देशासाठी आणि मराठी जनतेसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या पुढाकाराने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पंडित हृदयनाथ मंगेशकर, श्रीमती उषाताई मंगेशकर, कौशल विकास, नाविन्यता व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, कॅप्टन रवी सेल्वन, प्रसाद लाड, अमित साटम, संजय उपाध्याय, सुनील राणे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात आलेल्या १२ किल्ल्यांच्या नामांकनाला केंद्र शासनाने प्राधान्य दिले आणि युनेस्कोसमोर १२ किल्ल्यांची अधिकृत शिफारस केली. देशभरातून विविध राज्यांनी अनेक स्थळे सुचवली होती, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांनीच भारताचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पुढाकार घेतला असे निदर्शनास आणून देत फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. किल्ल्यांच्या स्थापत्यकलेचे विविध पैलू उलगडत त्यांचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व सांगताना फडणवीस म्हणाले की, राजगड, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर स्वराज्याचे बिनतोड आधारस्तंभ आहेत. जलदुर्गांचे बांधकाम त्या काळात किती कठीण होते, हे आजही समजून घेणे कठीण आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामात ३२ लाख किलो चुना आणि १० लाख किलो लोखंड वापरण्यात आले. यावरून महाराजांच्या दूरदृष्टीची आणि प्रशासनिक कौशल्याची प्रचीती येत असल्याचे सांगत त्यांनी किल्ल्यांच्या राज्यकारभारातील भूमिकेवरही प्रकाश टाकला.
प्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना, मुख्यमंत्री म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नाही, तर या यशामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विद्यमान मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे विशेष कौतुक करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आशिष शेलार यांनी हे तांत्रिक सादरीकरण पॅरिसमध्ये जाऊन केले आणि युनेस्कोच्या अधिकाऱ्यांसमोर किल्ल्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या योगदानामुळेच हा गौरव शक्य झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण, उभारणी आणि पुनर्बांधणी केलेल्या असंख्य किल्ल्यांमध्ये १२ महत्त्वाचे किल्ले ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ या प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले. यामध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील असून, एक तामिळनाडूमधील जिंजी हा किल्ला आहे. या प्रस्तावाची पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी गीते, पोवाडे, स्मृतिगीते आणि जाणता राजा महानाट्यातील शिवराज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

