फलटण शहर ता. ११ : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला तुतारीचा कोणताही फरक पडणार नाही.

लोकसभेला मला अठरा हजार मते देऊन फलटणच्या जनतेने तुतारीला गाडले आहे. शरद पवार यांनी फलटण तालुक्याला देण्याऐवजी नेण्याचच काम केलं आहे, त्यामुळे फलटणमध्ये आता तुतारी चालणार नाही असा विश्वास व्यक्त करून तालुक्यातील सहकार मोडीत काढून, गोरगरीब कुटुंबातील पोरांच्या पगारातील भाड खाण्याचे काम कोण करत आहे हे आता तालुक्याला समजलं आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील नारीशक्ती व जनशक्ती आमच्याच पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
फलटण येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, सचिन कांबळे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य माणिकराव सोनवलकर, विश्वासराव भोसले, समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर, मनिषा नाईक निंबाळकर, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, नानासो इवरे, अशोकराव जाधव, विलासराव नलवडे, विराज खराडे, महादेव पोकळे, बजरंग गावडे, रणजितसिंह भोसले, सूर्यकांत दोशी आदीसह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आमदार रामराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या बंधूंनी फलटण तालुक्यात गेल्या तीस वर्षात गुलामांची गुलामशाही निर्माण करून पुन्हा राजेशाही प्रस्थापित केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली लोकशाही मोडीत काढून आपलाच कुटुंबातील लोकांना सत्तेवर बसवणाऱ्यांची झुंडशाही आता संपुष्टात आणण्याची वेळ आलेली आहे. शरद पवार हे देशाचे नेते होते तर रामराजेना मुख्यमंत्र्यापेक्षा वरचा दर्जा होता पण त्यांनी केवळ पवार यांची इमाने इतबारे सेवा करायची म्हणून तालुक्याचे येणारे पाणी, एमआयडीसी, रस्ते अडवले. गेल्या तीस वर्षातील बारामती व फलटण यांच्यातील विकासाची तुलना पाहता आता सत्तांतर केल्याशिवाय पर्याय नाही हे येथील जनतेला कळून चुकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, महिला, मजूर, कामगार, नोकरदार व जनतेला एवढे चांगले दिले आहे की आता ही नारीशक्ती व जनशक्ती कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता पुन्हा एकदा महायुतीच्याच पाठीशी ठाम राहील असा विश्वासही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट –
त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार..!
फलटण तालुक्यात जनतेनेच आपल्या हातात निवडणूक घेऊन आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर, आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, आमदार चिमणराव कदम, खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या वेळेस त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल व महायुतीचे सचिन कांबळे पाटील हे विजयी होतील असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फोटो –
फलटण : बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर व उपस्थित जनसमुदाय

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!