
फलटण : पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, तरतुदी यांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित पत्रकाराकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित वृत्तपत्रास मंजूर असलेल्या अधिस्वीकृती पत्रिकेच्या कोट्यापेक्षा, त्या त्या वृत्तपत्रात अधिक पत्रकार असल्यास, अधिस्वीकृती पत्रिकेसाठी पात्र ठरत असूनही केवळ “त्या वृत्तपत्राच्या कोट्यात बसत नाही” या कारणामुळे ते अधिस्वीकृती पत्रिकेपासून आणि त्याद्वारे मिळणारे लाभ यापासून वंचित राहतात. यास्तव वृत्तपत्रांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याची शिफारस राज्य अधिस्वीकृती समितीने शासनाकडे करावी, अशी सूचना निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केली.
ठाणे येथील महानगरपालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने “पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत ते होते.
पत्रकारांसाठी शासनाच्या वतीने आरोग्य योजना, कल्याण निधी योजना, गृहनिर्माण संस्था, पत्रकार भवन या साठी जागा आणि काही प्रमाणात आर्थिक मदत, म्हाडा, सिडको च्या घरांमध्ये दोन टक्के आरक्षण, एस टी महामंडळाच्या बस मध्ये मोफत प्रवास, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांना आणि आता निकष पूर्ण करणाऱ्या डिजिटल माध्यमांना जाहिराती अशा विविध प्रकारे सहाय्य करण्यात येते. पण हे सर्व लाभ मिळण्यासाठी पत्रकार अधिस्वीकृती धारक असण्याची प्रमुख अट आहे, असे स्पष्ट करून देवेंद्र भुजबळ म्हणाले, त्यामुळे या अटींची काटेकोरपणे पूर्तता करण्यासाठी पत्रकारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत राहतील, याची काळजी घेतली पाहिजे. पत्रकारितेतील करार पद्धतीमुळे पत्रकारांना श्रमिक पत्रकार कायदा,१९५५ मधील तरतुदींनुसार मिळणारे संरक्षण, वैद्यकीय आणि इतर अनुषंगिक लाभ मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे देशभरातील पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन करार पद्धतीने काम करीत असलेल्या पत्रकारांना १९५५ च्या कायद्यातील संरक्षण आणि अनुषंगिक लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,अशी अपेक्षाही यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली.
यावेळी ऑर्गोनॉमिक्स प्रोग्राम मॅनेजमेंट एक्सपर्ट डॉ. मोना पंकज, पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी, संजय पितळी यांचेही मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या,प्रसारमाध्यमातील विविध व्यक्तींवर लिहिलेल्या “माध्यमभूषण ” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दै.ठाणे वैभवचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेस ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलास म्हापदी, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक सोनावणे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल वाघोले, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (माध्यम आराखडा) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.गणेश मुळे, कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक (माहिती) अर्चना शंभरकर, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

