
फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा परतीच्या वाटेवर असताना तिथीचा क्षय असल्याने प्रतिवर्षी प्रमाणे चतुर्थीऐवजी तृतीयेला अर्थात रविवार, दि. १३ जुलै रोजी फलटण येथे मुक्कामी विसावणार आहे. यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी केले आहे.
नेहमी आषाढ वद्य चतुर्थीस फलटण मुक्कामी येणारा सोहळा या वर्षी एक दिवस अगोदर आषाढ वद्य तृतीयेस फलटण सायंकाळी मुक्कामी येत असून तो नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, रविवार पेठ येथे मुक्कामाला विसावणार आहे. संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी दि. १९ जून रोजी आळंदीहून प्रस्थान ठेवले. पंढरपूर येथे आषाढी एकादशी नंतर परतीच्या वाटेवर सोहळा गुरुवार, दि. १० जुलै रोजी पंढरपूर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाला आहे. गुरुवारी वाखरी, शुक्रवार दि. ११ रोजी वेळापूर, शनिवार दि. १२ रोजी नातेपुते येथे मुक्काम करणार आहे. रविवार दि. १३ जुलै रोजी धर्मपुरी व साधुबुवा ओढा येथे सकाळचा विसावा, बरड, पिंप्रद, विडणी येथे दुपारचा विसावा आटोपून रात्री नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, फलटण येथे मुक्काम करणार आहे. सोमवार दि. १४ जुलै रोजी सकाळी निंभोरे ओढा, सुरवडी, दत्त मंदिर, काळज येथे सकाळचा विसावा, तरडगाव येथे दुपारचा विसावा आणि लोणंद पूल फाटा येथून हा सोहळा रात्री पाडेगाव मुक्कामी थांबणार आहे. मंगळवार दि. १५ जुलै रोजी वाल्हे, बुधवार दि. १६ रोजी सासवड, गुरुवार दि. १७ रोजी हडपसर, शुक्रवार दि. १८ रोजी भवानी पेठ, पुणे, शनिवार दि. १९ जुलै रोजी पुणे, रविवार दि. २० रोजी आळंदी आणि सोमवार दि. २१ जुलै रोजी हा सोहळा संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली मंदिर येथे मक्कामास पोहोचणार आहे.
