
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण मधील बी.एस.सी. कृषीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेती व त्यासाठी लागणारे सेंद्रिय निविष्ठा बनवणे याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
सध्या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम दिसून येत आहेत त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, तसेच येणाऱ्या भावी पिढीने देखील सेंद्रिय शेतीची माहिती व प्रसार केला पाहिजे या तत्वास अनुसरून कृषी महाविद्यालय, फलटण येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना सेंद्रिय खत कसे बनवावे उदाहरणार्थ गांडूळ खत निर्मिती कशी करावी, त्यासाठी लागणारी सामग्री कशी निवडावी, त्याची उत्तम प्रत कशी जपावी, त्याचा वापर कसा करावा, जमिनीसाठी सेंद्रिय खताचे फायदे काय असतात, त्यासाठी लागणारा खर्च या सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जात आहे.
गांडूळ खत निर्मिती बरोबरच महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना सेंद्रिय कीटकनाशक दशपर्णी अर्क बनवण्याची प्रशिक्षणही दिले जात आहे. याबरोबरच सेंद्रिय वाढ संवर्धक पंचगव्य, जीवामृत, वर्मीवॉश या सर्व घटकांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता तयार होऊन त्यांचा फायदा आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम टाळत सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्याकडे हे कृषी महाविद्यालय विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे देऊन कौशल्य विकसित करून विद्यार्थी घडवत आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्रातील उद्योजकता व व्यवसायभूमिकता निर्माण करण्यासाठी मदत होत आहे.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.ए. कुलाळ, डॉ. जी.एस. धायगुडे, कृषी विद्यावेत्ता विभाग, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी. चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.
