पूर परिस्थिती टाळण्यास कोयनेच्या पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

फलटण : कोयना धरणात सध्या ६५ टक्के पाणी साठा झाला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. पाणी विसर्गामुळे पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
दूरदृष्य प्रणालीद्वारे कोयना धरणातील पाणी पातळी, पडत असलेला पाऊस यांचा आढावा घेत असताना पालकमंत्री देसाई यांनी सदर निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मागील तीन वर्षाचा पडलेल्या पावसाचा अभ्यास करुन व या वर्षीच्या पावसाचा अंदाज काढून कोयना धरणातील विसर्गाचे बारकाईने नियोजन करावे असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, कोयना धरणातील पाणी सोडत असताना नदीकाठच्या गावांना आदी सतर्कतेचा इशारा द्या. विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोयना नदीला उपनद्यांचे पाणी मिळत असते त्यामुळे विसर्गाचे बारकाईने नियोजन करा. सर्कल, तलाठी, पोलीस पाटील यांच्या बैठका घ्या. ज्या गावांना पुराच्या पाण्याचा धोका आहे त्या गावांमध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत याबाबत सूचना देण्यात याव्या असेही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!