
फलटण (किरण बोळे) :
दिव्य सोहळा पाहुनी डोळा
देह हा माऊली माऊली झाला
रंगी रंगला जीव दंगला
भुवरी आनंदी आनंद झाला
या प्रमाणे मजल-दरमजल करीत आषाढी वारीतील एक एक टप्पा पार करीत विठ्ठलभेटीच्या ओढीने पंढरीला निघालेला वैष्णवांचा मेळा आज फलटण मुक्काम आटोपून बरडकडे प्रस्थानित झाला. गावोगावीच्या भक्तांच्या सेवेचा, भक्तीचा स्विकार करून आज हा सोहळा सातारा जिल्ह्यातल्या शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला. उद्या (दि.३०) रोजी हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
आळंदीहुन पंढरपूरकडे निघालेला माउलींचा हा सोहळा काल सायंकाळी (दि.२८) ऐतिहासिक फलटणनगरीत विसावला. माऊलींचा पालखी सोहळा फलटण शहरात दाखल झाल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. पालखी मुक्कामस्थळी विमानतळावर पहाटे पर्यन्त भाविकांची गर्दी होती. माउलीच्या सेवेत कोणती कमतरता राहु नये म्हणून प्रशासन व फलटणकर आपआपल्या परीने प्रयत्नशील व कार्यरत होते. फलटण येथील एक दिवसाचा मुक्काम उरकुन आणि फलटणकरांच्या स्वागताने भारावलेल्या माऊलींच्या सोहळ्याने आज सकाळी सहाच्या सुमारास फलटणहून बरड मुक्कामाकडे प्रस्थान केले. तत्पुर्वी पहाट पूजेनंतर माउलींच्या पादुकांवर राजघराण्यातील सदस्य आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तुळशी पत्र वाहण्यात आले. फलटणचा मुक्काम संपवून पालखी सोहळा शहरातील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर आला असता नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने माउलींची पूजा झाली आणि प्रत्येक दिंडीस नारळ, साखर देण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणे ती देण्यात आली. फलटण शहरातुन बरड येथील मुक्कामासाठी प्रस्थान केल्यानंतर शहरा बाहेरील नीरा उजवा कालव्यावरील राऊरामोशी पुल परिसरातही भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. या नंतर हा सोहळा विडणी येथे न्याहरीकरीता थांबला. विडणी गावच्या शिवेवर अबदागिरेवाडी येथे विडणीचे सरपंच सागर अभंग, उपसरपंच मनीषा नाळे, पोलिस पाटिल शीतल नेरकर, ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे, तलाठी राहूल इंगळे आदी मान्यवरांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील इतर प्रतिष्ठित माण्यवर व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. विडणी गावात आल्यानंतर खांदेकरी यांनी माउलींच्या पादुका पालखीतून विसाव्याच्या ठिकाणापर्यंत नेली. न्याहरीकरिता विसावल्यानंतर राजेंद्र पवार, अर्चना पवार व महेंद्र पवार, प्रिती पवार या दांपत्यांच्या हस्ते मानाची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. या वेळी माऊली व विठ्ठल नामाच्या जयघोषाने व टाळ मृदूंगाच्या घोषाने हा परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी विडणीकरांनी वारकर्यांना मोफत चहा, नाष्टा व फळ वाटप व अन्नदान केले. विडणी व परिसरातील भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतल्यानंतर न्याहरी आटोपून माऊलींचा सोहळा दुपारच्या भोजनासाठी पिंपरदकडे मार्गस्थ झाला. पिंपरद येथे या सोहळ्याचे स्वागत सरपंच स्वाती भगत, उपसरपंच सागर बोराटे, पोलीस पाटील सुनिल बोराटे यांच्यासह सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले. पिंप्रद येथे माऊलींच्या पादुकांना स्नान घालुन वारीतील सर्व दिंड्यांच्या वतीने माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारच्या भोजनानंतर मार्गस्थ झालेला हा सोहळा सायंकाळच्या विसाव्यासाठी वाजेगाव येथे विसावला. वाजेगाव येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदींसह ग्रामस्थांनी ‘माऊली….माऊली’ च्या जयघोषात सोहळ्याचे स्वागत केले. सुमारे अर्ध्या तासाचा विसावा घेवून हा सोहळा बरड कडे मुक्कामाला रवाना झाला. बरड येथील पालखी तळावर माऊलींचे आगमन झाल्यावर सोहळ्याचे स्वागत बरड ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक व सहकारी संस्था, सार्वजनिक मंडळे यांच्यावतीने करण्यात आले. बरड येथील पालखी तळावर माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामाकरिता विसावल्यानंतर बरड व परीसरातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या.
दरम्यान बरड येथील माऊलींचा मुक्काम हा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा उद्या सोमवार (दि.३०) रोजी दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यावेळी दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर या सोहळ्याला निरोप देण्यासाठी व स्वागतासाठी सातारा व सोलापूर जिल्ह्यातील मुख्य प्रशासकीय आधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.
