
फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण (जि.सातारा) येथे शनिवारी २८ जून रोजी सायंकाळी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलटण येथील दहावी बोर्ड परीक्षा केंद्र इमारतीत कोल्हापूर विभागीय मंडळाने बदल केला आहे.
मंगळवार २४ जून पासून बोर्डाची दहावी बारावी पुरवणी परीक्षा सुरू झाली आहे. फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे दहावी परीक्षेचे केंद्र आहे. या परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या मैदानावर प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी भव्य जर्मन टेन्ट उभारलेला आहे, तसेच सर्व शाळा खोल्यांमध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र इमारत बदलणे आवश्यक होते.
कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नुकतीच फलटण येथील दहावी व बारावी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या व यशवंतराव चव्हाण हायस्कूल इमारतीच्या शेजारीच असलेल्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात शनिवार दिनांक २८ जून या दिवसापुरते हे दहावीचे परीक्षा केंद्र हलवण्यात आले आहे. या दिवशी हिंदी विषयाचा पेपर असून ५८ विद्यार्थ्यांनी या विषयासाठी नोंदणी केली आहे. बदलण्यात आलेल्या केंद्रावर परीक्षा आयोजित करण्याबाबत विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी केंद्रसंचालकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. कोणत्याही अडथळ्याविना विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी अशी व्यवस्था करण्याबाबत, तसेच बदललेल्या केंद्राबाबत सर्व संबंधित विद्यार्थ्यांना शाळांमार्फत सूचना देण्याबाबत कळवले आहे.
बारावी पुरवणी परीक्षेसाठी फलटण येथे मुधोजी महाविद्यालयात परीक्षा केंद्र आहे. या दिवशी येथे भौतिकशास्त्र व सहकार या विषयांचा पेपर होणार आहे. या केंद्रावरील बैठक व्यवस्थेत या दिवशी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तिथे परीक्षेसाठी आवश्यक पुरेशा वर्ग खोल्या व इतर सुविधा उपलब्ध आहेत. या दिवशी फलटण येथील या दोन्ही परीक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता पेपर सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळ सत्रात सकाळी दहा पूर्वी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतुकीचे संभाव्य अडथळे लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक नियोजन करून निर्धारित वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दोन्ही केंद्रांना विभागीय अध्यक्ष क्षीरसागर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, विस्तार अधिकारी सी.जी. मठपती, महाविद्यालयाचे प्राचार्य उदय जाधव, दहावी केंद्र संचालक विजया सुरवसे, वाय.सी. कॉलेजचे प्राचार्य प्रकाश घनवट, मुधोजी कॉलेजचे प्राचार्य पी.एच कदम, बारावी केंद्र संचालक नीलम देशमुख उपस्थित होत्या.

