रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोळकीतील पूलाचे काम मार्गी लावणार : सचिन रणवरे

फलटण : फलटण शिंगणापूर मार्गावरील कोळकी ता. फलटण गावच्या हद्दीतील तो जीर्ण पूल सद्यस्थितीतही वाहतूकीस धोकादायक आहे. या पूलाच्या जागी अधिक रुंदीचा व नवीन स्लॅबच्या पूलाला मंजुरी मिळून त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी आपण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे यांनी केले आहे.
कोळकी ता. फलटण येथील जीर्ण पूलाची बातमी ‘सह्याद्री बाणा’ ने प्रसिद्ध केल्यानंतर सचिन रणवरे यांनी या पूलाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. शिंगणापूर मार्गांवर भाजी मंडई नजीकचा पूल आजही धोकादायक अवस्थेत आहे. शिंगाणापूरहून फलटणकडे येत असताना या रस्त्यावर तीव्र उतार आहे. या रस्त्यावरील वर्दळीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

या पूलाच्या शेजारी भाजी मंडई भरत असल्याने पूलाची रुंदी वाढविणे अत्यावश्यक आहे. मालोजी नगर परिसरातील पाणी सध्याच्या जीर्ण पूलाखालून जाते, परंतु हे पाणी पूलाखाली टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या पाईपमधून पलीकडे न जाता ते पाझरून पलीकडच्या बाजूस जाते. त्यामुळे हा पूल कमकुवत व वाहतूकीस धोकादायक बनला आहे. सध्याच्या जीर्ण पूलाची डागडुजी करण्यात आली असली तरी सद्य स्थितीतील पूल कोसळून केव्हाही अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जीर्ण पूल काढून त्याठिकाणी नवीन स्लॅबचा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे तात्काळ या नवीन पूलाच्या कामाचे तातडीचे दुरुस्ती म्हणून किंवा नवीन पूलाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या मागणीबरोबर त्यास शासन पातळीवर लवकरात लवकार मंजुरी मिळावी व पूल व्हावा यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे सचिन रणवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!