अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

फलटण : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी पूरपरिस्थिती व पर्जन्यमान स्थितीचा आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विगाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसामुळे पिण्याचे पाणी गढूळ येत आहे. या पाण्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा आजारांना सामारे जावे लागते. ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये. प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधासाठा करुन ठेवावा असे स्पष्ट निर्देश देत मंत्री देसाई म्हणाले, अतिवृष्टीमुळे सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या योजना तसेच विद्युत पोल, विद्युत तारा तुटल्या आहेत, याचेही नुकसानीचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील विविध वाहतूक मार्गावर भुस्खलन झाल्यास तेथील राडा रोड काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा तयार ठेवावी. शाखा अभियंता यांनी मान्सून कालावधीत आपल्या तालुक्यात रहावे.
सातारा जिल्ह्यातील मोठ्या धरणात ३२ टक्के तर लहान धरणाांमध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. लहान धरणातून अंदाजे पुढील आठवड्यात विसर्ग सोडला जाईल. कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात तीन रस्ते बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!