फलटण : मी एक वेळ घरी बसेन; पण महायुतीचा प्रचार करणार नाही. महायुतीत आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी एवढीच आमची अपेक्षा होती. लोकसभेवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या मीटिंगमध्ये आ. गोरे यांनी माझ्यावर मी त्यांना मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला. या दोघांनी माझ्यावर खंडणीचा गुन्हा लावण्याचा प्रयत्न केला. ज्याने माझ्या आई-वडिलांबद्दल वेडे वाकडे बोलले त्याच्या स्टेजवर मी जाऊन बसेल एवढा नामर्द मी नाही. जे भोगायला लागेल त्याची माझी तयारी आहे, असा इशारा आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी दिला.
मला आता राजकीय महत्त्वाकांक्षा उरलेली नाही. माझं देवेंद्र फडणवीस किंवा भाजपशी वैर नाही. भाजपांच्या देशपातळीवरील वरिष्ठांशी ही मतभेद नाहीत. आमची कोणतीच वेगळी तत्व प्रणाली नाही. आमच्या लोकांचे भले व्हावे हीच आमची तत्व प्रणाली आहे. मात्र, गरज भासल्यास पार्टी न बघता त्या दोघांच्या विरोधात प्रचार करणार आहे.
आ. रामराजे पुढे म्हणाले, पक्ष सोडतेवेळी पवार साहेबांना भेटायला गेलेल्या मध्ये एकाचीही इच्छा नव्हती की पवार साहेबांना टाकून आपण सत्तेत सामील व्हावे. याचा मी साक्षीदार आहे. कार्यकर्त्यांवर होणार्या अन्यायापासून वाचवण्यासाठी पवार साहेबांना सोडून गेलो. आता कार्यकर्ताच राहणार नसेल तर आमचं कुठेही असणं काय उपयोगाचं? आमच्यातील कार्यकर्त्यांना पैशाचे आम्हीच दाखवून, धमकावून फोडले त्यास त्यांच्या वरिष्ठांची साथ मिळत होती. अशावेळी आम्ही आमच्या नेतृत्वाकडे तक्रार केली. अजितदादांना चार- चार वेळा हे सांगितले. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर इथे काहीही केले जातेय. माझ्या विरोधात असणार्या नाईक निंबाळकर घराण्याची पार्श्वभूमी तपासा. त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीबद्दल समाजात काय बोलले जाते हेही तपासा. कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून अजितदादांबरोबर गेलो त्यामुळे पवार साहेबांना दुखावले. अजितदादा कडे जाऊनही कार्यकर्ता जिवंत राहणार नसेल, त्याचे संरक्षण होत नसेल तर कोणाचे सरकार येईल हे न पाहता आता विरोधात उडी घेतली. कार्यकर्त्यांवरील अन्याय न थांबल्याने सत्तेच्या विरोधात आता ठामपणे उभे राहिलो आहे, असेही आ. रामराजे म्हणाले.