कोळकी (ता. फलटण) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेतच आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, अनिकेतराजे ना. निंबाळकर, विश्वजितराजे ना. निंबाळकर यांच्यासह राजे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, उत्तमराव जानकर, प्रभाकर देशमुख, सुभद्राराजे ना. निंबाळकर, सत्यजित पाटणकर, रघुनाथराजे ना. निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सरचिटणीस अभयसिंह जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. शरद पवार म्हणाले, राज्यात लहान मुलींवर अत्याचार झाले. त्यांच्यावर कारवाई करायला किती वेळ गेला. आजचे राज्यकर्ते सरकार सांभाळताना कमी पडत आहेत. पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता असताना त्यांना लाडकी बहिण दिसली नाही, बहीण दिसली कधी तर लोकसभेला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 जागा आम्ही जिंकल्या, त्यानंतर त्यांना बहीण आठवली. खा. पवार म्हणाले, कारखानदारीचा पाया मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी रचला. त्या काळात कसलेही सरकारी काम असले की फलटणला यायचो. फलटणशी अनेक पिढ्यांचा ऋणानुबंध आहे, मध्ये थोडी गडबड झाली, ठीक आहे. झाले ते झाले. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. चार महिन्यांपूर्वीच्या आणि आजच्या सभेत फरक जाणवतोय. लोकसभेला बारामतीमध्ये एक बहीण उभी होती. बारामतीकर प्रचाराच्या वेळी गप्प बसायचे. मी विचार करायचो काय झालं? इतक्या वर्षाच्या जिवाभावाचं संबंध! आता कोणीच बोलत नाही? मतमोजणी झाली तेव्हा कळलं लोक राजकारण्यांपेक्षा अधिक शहाणे आहेत. लोकांना कळतं काय करायचं? कुणासाठी करायचं? कधी करायचं? असेही खा. पवार म्हणाले.