महाबळेश्वर येथे दोन दिवस ‘हनी बी पर्यटना’ चे आयोजन ; मधमाशांचा जीवनक्रम, जाती, प्रकार व मधयंत्र विषयी पर्यटकांना मिळणार माहिती

फलटण ता. १ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित महापर्यटन उत्सव अंतर्गत विविध सहलींचे आयोजन करण्यात आले असून राज्यात “हनी बी पर्यटना’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर येथे २ ते ४ मे २०२५ या कालावधीमध्ये ‘हनी बी पर्यटन’ टूरचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पर्यटकांना मधमाशी पालन उद्योगाची व या उद्योगाची निगडित असणाऱ्या सर्व घटकांची माहिती देण्यात येणार आहे.
पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री शंभुराज देसाई व पर्यटन, उच्च व तंत्र शिक्षण,आदिवासी विकास, मृदु व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या नेतृत्वाखाली व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ‘महा पर्यटन महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक राहील व यासाठी वेबसाईटवर संपर्क क्रमांक व नोंदणी शुल्क आणि टूरचा प्रकार सविस्तर नमूद करण्यात आलेला आहे. या टूरचे ‘हनी बी टूर’ व ‘मधाचे गाव मांघर’ असे दोन भाग करण्यात आले आहेत. सहलीला जाण्यासाठी गोल्फ क्लब ग्राउंड व एमटीडीसी रिसॉर्ट येथून या सहलीमध्ये सहभाग होण्यासाठी नोंदणी करण्यात आलेल्या पर्यटकांना मध संचालनालय महाबळेश्वर येथे एकत्रित करण्यात येईल. कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर पर्यटकांचे स्वागत करण्यात येईल. महाबळेश्वर येथे कोणकोणत्या बाबी आपण पाहणार आहोत याविषयी माहिती देण्यात येईल त्यानंतर पर्यटकांना संचालनाला यामध्ये असणाऱ्या विविध विभागांना भेटी देऊन राज्य शासनाची मध संचालनाची स्थापना करण्याचा उद्देश, महाबळेश्वर येथील प्रशिक्षण, संशोधन, मध प्रक्रिया, मधुबन मधमाशा पालन उद्योगासाठी आवश्यक असणारे साहित्य वाटप, मंडळामार्फत मधाची खरेदी, मधुबन ब्रँड एगमार्क सेंद्रिय मध प्रमाणीकरण आदी माहिती यावेळी देण्यात येईल. त्या शिवाय खालील घटकांचा व माहितीचा समावेश टूरमध्ये असणार आहे.
१ ) हनी पार्क :
हनी पार्कमध्ये मधमाशा पालन उद्योगातील माहितीचे बोर्ड लावलेले असून यामध्ये मधमाश्या पालन व्यवसायामध्ये रोजगार निर्मिती कशा प्रकारे केली जाते. मधमाशांचा जीवनक्रम मधमाशांच्या जाती मधमाशांचे प्रकार व त्यांचे कार्य तसेच विविध प्रकारच्या मधपेट्या मधयंत्र या विषयी माहिती देण्यात येईल
अ) मधुबन :
मधुबन मध्ये सातेरी व मेली फेरा या जातीच्या मधपेट्या वसाहतीसह ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक मध पेटी उघडून त्यातील मधमाशा, राणी माशी, कामकरी माशी, नर माशा त्यांची अंडी, अळी, पी लावा, पोळी भरलेला मध हे प्रत्यक्ष दाखवण्यात येईल. पर्यटकांना मध पोळे हातात घेऊन त्यांची सेल्फी देखील काढता येईल. मधुबनामध्ये मधमाशांना आवश्यक असणारे खाद्य मकरंद पराग देणाऱ्या वनस्पती जांभूळ, गेळा, हिरडा, पिसा, कारवी, व्हायटी, आखरा आदी वनस्पतींची माहिती देण्यात येईल. तसेच I love Madhuban या सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी पर्यटक सेल्फीही काढू शकतील.
ब) संग्रहालय :
विविध शास्त्रज्ञांचे फोटो फुलोऱ्याचे वेळापत्रक, विविध प्रकारची मध यंत्र, मधमाशीचे चित्र व त्यांच्या अवयवांची नावे, मधमाशा मध कसा तयार करतात याविषयी माहिती असणारे हे संग्रहालय असून तेथे माहिती देण्यात येईल.
क) मध प्रक्रिया युनिट :
या युनिटमध्ये मध प्रक्रिया संचद्वारे मधावर प्रक्रिया केली जाते. वमेण प्रक्रिया करून मेण पत्रा तयार केला जातो. आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या मध प्रक्रिया युनिटमध्ये मधातील पाण्याचे प्रमाण कमी करणे व पाश्चरायझेशन बाबत व प्रक्रियेमधील स्टेजेस याची माहिती देण्यात येईल. कच्चा मेणा पासून मेण पत्रा तयार तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. तसेच मध बॉटलिंग, पॅकिंग, लेबलिंग कसे होते ते दाखवण्यात येईल.
ड) प्रयोगशाळा :
या ठिकाणी मधाची शुद्धता तपासणी, मधामध्ये कोणते घटक असतात, मधाचे मानवी शरीराला उपयोग काय आहेत या विषयी माहिती देण्यात येईल. येथे असणारी उपकरणे पाहता तेथील तसेच विविध प्रकारच्या वनस्पतीच्या मधातील असणाऱ्या पोलंद्वारे कोणत्या वनस्पतीचा मध आहे हे प्रात्यक्षिक तपासून दाखवण्यात येईल.
इ) व्याख्यान सत्र :
सर्व प्रशिक्षणार्थींना मधमाशा पालन व्यवसायाद्वारे रोजगार निर्मिती, प्रशिक्षणाची सुविधा, मार्केटिंग सुविधा याविषयी माहिती देण्यात येईल. तसेच मध व्यवसायाच्या पुस्तिका निशुल्क पुरवण्यात येतील.
ई) मंडळाचा मधुबन मध खरेदी :
कार्यालयाच्या आवारातील विक्री केंद्रावर मंडळाचा मधुबन या ब्रँडचा सेंद्रिय मध पर्यटकांना खरेदी करता येईल. या टूरमध्ये मध संचालनालयचे संचालक आणि इतर ज्येष्ठ सहाय्यक हे माहिती देण्यासाठी सहभागी होतील.
२ ) मधाचे गाव मांघर :
मध संचालनालय सरकारी बं. नं.५ महाबळेश्वर येथून पर्यटकांना मधाचे गाव मांघर या ठिकाणी नेण्यात येईल. मांघर हे गाव महाबळेश्वर पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव तापोळा रस्त्यावर आहे. तापोळा मांघर प्रवेश हद्दीत मधाचेगाव मांघर अशी कमान उभारलेली आहे. गावात जाईपर्यंत सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मधमाशांना उपयुक्त अशा वनस्पती आढळून येतात. त्या वनस्पतीवर नाव देखील दिलेले आहेत तसेच निसर्ग संवर्धन पर्यावरण पर्यटन मधमाशापालन याची माहिती सांगणारे बोर्ड लावलेले आहेत.
अ) वैयक्तिक मधुबन :
जाताना दुतर्फा गावकऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक मध पेटींचे मधुबन स्थापन केलेले आहे हे वैयक्तिक मधुबन जाताना पर्यटकांना दाखवण्यात येईल.
ब) नॉर्थकोर्ट पॉईंट :
वन विभागाच्या हद्दीत उंचावर नॉर्थ कोर्ट पॉईंट आहे हा पॉईंट पाहता येईल या ठिकाणावरून समोर मकरंद गड, एका बाजूला प्रतापगड, एका बाजूला महाबळेश्वर मधील गावे पुढे खालच्या बाजूला कोयना नदीचा महाबळेश्वर उगम पावलेला व पुढे तापोळ्याला जाणारा कोयना नदीचा पात्र प्रवाह पाहता येईल. उंचावरूनच डोंगरदर्‍यावरील उतारावरील शेतीचे विहंगम दृश्य अतिशय मनोहर आणि सुंदर पर्यटकांना दाखवण्यात येईल. याच ठिकाणावरून सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या, पर्वत रांगा दाखवण्यात येतील. या ठिकाणावरून सूर्यास्ताचे दृष्य देखील अतिशय सुंदर दिसते.
क) माहिती व प्रशिक्षण दालन :
जिल्हा नियोजन समिती सातारा यांच्या निधीतून माहिती व प्रशिक्षण दालन तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी मधमाशा पालन विषयक बाबीवरील माहिती, फोटोग्राफ्स लावण्यात आले असून मधमाश्या पालन उद्योगासाठी आवश्यक असणारी उपकरणे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!