जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

फलटण : सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस विभागाने जिल्ह्यातील चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीच बैठक संपन्न झाली, या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सदर निर्देश दिले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहायक आयुक्त योगेश शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व्ही.व्ही. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
काही औषधांचा वापर नशेसाठी केला जातो, अशी औषधे कोणत्या भागात जास्त विकली जात आहेत याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी l पाटील म्हणाले, याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. अवैध्यरित्या गांजा व अफूची शेती होणार नाही याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच अंमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी. जिल्ह्यातील मोठे हॉटेल, लॉज यांची पोलीस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी व अंमली पदार्थ आढळल्यास त्वरीत गुन्हे दाखल करावे. अंमली पदार्थांची विक्री होणाऱ्या ठिकाणी अचानक धाडी टाकाव्यात, जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत. पोलीस विभागाने ड्रग पडकल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी यंत्रसामुग्री जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करावी, असे निर्देशही पाटील यांनी बैठकीत दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!