
फलटण : फलटण-पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात गतिमान झाली असून सातारा जिल्ह्यात मात्र या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झाली नसल्याने हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास कधी जाणार याविषयी उलट सुलट चर्चा सुरु आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून या ब्रिटिश काळात सर्वेक्षण व भूसंपादन झालेल्या रेल्वे मार्गाचे काम पुन्हा सुरु करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले, त्यासाठी केंद्राची मान्यता, केंद्र व राज्य शासन प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करुन देईल अशी तरतूद करुन घेतली, मात्र सातारा जिल्हा प्रशासन या कामात मागे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून लोणंद-फलटण-बारामती हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास जात आहे, लोणंद-फलटण मार्गावर रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे, फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरु आहे. फलटण-पंढरपूर सुरु व्हावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय महसूल आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाच्या क्षेत्राचे संपादन बाबत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर नियोजन भवन येथे आढावा घेतला. महसूल विभागाकडील नोंदी, गाव नकाशे तसेच भूमि अभिलेख यांच्याकडील नोंदी व नकाशे याद्वारे या रेल्वे मार्गाच्या क्षेत्राची तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी सुचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक घोडके, रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

पंढरपूर – लोणंद रेल्वे प्रकल्पाचे भूसंपादन बाबतचे जुने रेकॉर्ड रेल्वे विभागाकडे असू शकते त्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या रेकॉर्डची जबाबदारी असलेल्या कार्यालयाने त्यांच्या स्तरावर अभिलेख तपासणी करावी व ते रेकॉर्ड सोलापूर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन द्यावे. या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन चांगले काम करत असून रेल्वे विभागानेही त्यांना तेवढेच सहकार्य करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी केली.
पंढरपूर-लोणंद रेल्वे प्रकल्प अंतर्गत माळशिरस तालुक्यातील १२ व पंढरपूर तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जुन्या गावांची विभागणी झाल्याने माळशिरस तालुक्यात ३ गावे तर पंढरपूर तालुक्यात २ गावे वाढलेली असून एकूण गावांची संख्या २० इतकी झाली आहे. हा रेल्वे मार्ग ब्रिटिश कालावधीत सर्वेक्षण व भूसंपादन झालेला रेल्वे मार्ग आहे. या मार्गाच्या क्षेत्राचे संपादन हे मूळ जमाबंदीच्या वेळी झाल्याने त्याचा स्वतंत्र ७/१२ तयार झालेला नाही. प्रत्येक गावाच्या आकारबंधाचे तेरजेस रेल्वेचे क्षेत्र नमूद आहे. सन १९२९ मध्ये या जमीन गटाचे नोंदी घेण्यात आलेल्या होत्या तर सन १९४९ साली वरील संपादित जमीन अधिक धान्य पिकवा या योजनेखाली एकसाली लागवडीने देण्यात आलेल्या आहेत.
