
फलटण : फलटण तालुक्यात विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या वाढत्या चोऱ्या वीज वितरण कंपनी व पोलीस यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र असताना, अशा चोऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यावर ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ प्रभावी ठरत असल्याचे आशादायक चित्र दिसू लागले आहे. नुकतीच काशिदवाडी येथे विद्युत ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या टोळीला ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे पळ काढावा लागल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, आळंदी पंढरपूर पालखी महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काशिदवाडी ता. फलटण या गावात रविवार ता. २३ मार्च रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास सुमारे चार जणांची टोळी गावातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांनी खांबावरील ट्रान्सफॉर्मर कटरच्या सहाय्याने कट करून खालीही पाडला. परंतु चोरी होत असल्याचा प्रकार लक्षात येताच गावातील शेतकरी चंदन माने व पोलीस पाटील राहूल तंटक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश देऊन ग्रामस्थांना सावध केले व ग्रामीण पोलीस ठाण्यातही सदर चोरीचा प्रकार होत असल्याची माहिती दिली.

या बाबतची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पोलीस उप निरीक्षक गोपाळ बदने यांना सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना केले. त्याचबरोबर रामराव जराड, हरीश काशिद विठ्ठल काशिद, अतुल शिर्के, सुरज ढेंबरे, वडजलचे पोलीस पाटील विजयकुमार ढेंबरे, वायरमन सुहास बनकर हेही दाखल झाले. चोरट्यांना पोलिसांची व ग्रामस्थांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पळ काढला. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे ऐन उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मर चोरीचा प्रकार टळल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
