
फलटण : राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत असल्यामुळे राज्यातील शासकीय , निमशासकीय कार्यालयांत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी निवारा व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहेत अथवा नाहीत, याची खात्री करून नसतील तेथे या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खेड (सातारा) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई मेलद्वारे केली आहे.
सध्या संपूर्ण देशात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. उष्णतेचा पारा ४०-४१ डिग्रीपर्यंत पोचत आहे. येणाऱ्या दिवसात ही उष्णता अजून वाढून, उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यावर्षी प्रसंगी देशात ४५ डिग्री अंश सेल्सियसच्या पुढेही उष्णता जाण्याची शक्यता हवामान तज्ञांनी जाहीर केली आहे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयासह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा, उपविभागीय, तालुका, गावस्तरावरील कार्यालयांत दररोज शेकडो, हजारो नागरिक विविध कामांसाठी येत असतात. यामध्ये आजारी, अपंग, ज्येष्ठ नागरिकही असतात. कामासाठी हे लोक उन्हातान्हातून येत असतात. त्यांना एखाद्या कार्यालयात त्यांच्या कामासाठी अक्षरशः दोन, चार तास लागू शकतात. अशा वेळी त्यांना बसायला निवारा आणि पिण्यासाठी पाणी नसेल तर त्यांची खूपच गैरसोय होऊ शकते. तीव्र उष्णतेत ताटकळत उभे राहावे लागू शकते. अशा वेळी उष्णतेच्या त्रासाने नागरिकांना उष्माघाताचा त्रास, चक्कर येण्याचे त्रास होत आहेत. त्यातून भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर सर्व कार्यालयांमध्ये तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना करून झालेल्या कार्यवाहीचा आढावा आपण व्यक्तिशः घ्यावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
दरम्यान, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनाही अशा आशयाचे निवेदन पाठविण्यात आले असून, व्यक्तिशः भेटूनही त्यांना याबाबत उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यासाठी निवेदन देणार असल्याची माहितीही विकास कदम यांनी दिली आहे.
