
फलटण : शहरातील रविवारचा आठवडी बाजार पुर्वीच्याच ठिकाणी शहरात बसविण्यात यावा या मागणी बाबतचे निवेदन भाजपाचे शहाराध्यक्ष अनुप शहा व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसीम मणेर यांच्या नेतृत्वाखाली फलटण व्यापारी संघटनेच्या वतीने नगरपरिषद, तहसिलदार, पोलीस ठाणे आणि प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी याबाबतीत लवकरच बैठक बोलविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीत सुरक्षिततेच्या कारणावरून फलटण शहरात भरणारा आठवडी बाजार माळजाई मंदीराच्या परिसरात हलविण्यात आला आहे, त्यामुळे बाजार पेठेतील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील बाजारपेठ ही आठवडी बाजारावर अवलंबून आहे. बाजार पेठेतील व्यापारी वर्ग हा नगरपालीकेचे संकलीत कर, टॅक्स, भाडे नियमीतपणे व वेळेवर भरत असतो. कोरोनापासून बाजार पेठेतील उलाढाल कमी झाली आहे. व्यापारी वर्गाचे कर्ज वाढत चालले आहे. ऑनलाईन मार्केटमुळे पहिलेच व्यापरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पूर्ववत बाजार शहरात बसविला गेला तर व्यापारी वर्गाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लागेल. त्यामुळे आठवडी बाजार हा शहारातच बसाविण्यात यावा अशी आग्रही मागणी व्यापारी वर्गाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाजार पेठेत येणाऱ्या महिलांसाठी सार्वजनीक शौचालयाची सोय नसुन ती सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच बाजार पेठेतील रस्त्यांची कामे त्वरित पुर्ण करावीत अशा मागण्यांचाही निवेदनामध्ये समावेश आहे.
