
फलटण : भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या पुणे येथील ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स कार्यालयाच्या वतीने वाकड, पुणे येथे जागतिक ग्राहक अधिकार दिन साजरा करण्यात आला.
ग्राहक संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि विविध उद्योगांमध्ये गुणवत्ता मानकांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन वाकड, पुणे येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांची उपस्थिती होती.
यावेळी हनुमंत धुमाळ यांनी ग्राहक संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे ग्राहक चळवळीला पाठिंबा देण्यास प्रोत्साहित केले.
सूर्यकांत पाठक यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींबद्दल जागरूक राहून तसेच बीआयएस केअर ॲप सारख्या साधनांचा वापर करून ग्राहक स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विविध ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) लागू करून ग्राहकांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी बीआयएसच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी भारतीय मानक ब्युरोच्या पुणे येथील अधिकाऱ्यांनी बीआयएस उपक्रमांचा आणि बीआयएसने विकसित केलेल्या ग्राहक संरक्षण साधनांचा आढावा देणारे सादरीकरण दिले. ग्राहक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सोन्याच्या वस्तूंवर अनिवार्य हॉलमार्किंगची यशस्वी अंमलबजावणी ही एक महत्त्वाची कामगिरी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी बीआयएसशी संबंधित गैर-सरकारी संस्थांनी (एनजीओ) आपले विचार व्यक्त केले आणि बीआयएसच्या मानक क्लब, भारतातील ग्रामपंचायत संवेदनशीलता कार्यक्रम, मानक मंथन अशा विविध नवीन उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमात बीआयएस उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
बीआयएस पुणेचे शास्त्रज्ञ ई संचालक एस.डी. राणे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत केले.
आभार बीआयएस पुणेचे अधिकारी ज्ञान प्रकाश यांनी मानले.
कार्यक्रमास ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटना, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

