
फलटण : प्रगत शिक्षण संस्थेने केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात अंगणवाड्यांसोबत बालशिक्षणात उत्कृष्ट काम केले आहे. आंगणवाड्यांसाठीचे संस्थेचे काम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन टाटा एज्यूकेशन विभाग महाराष्ट्राच्या प्रमुख मालविका झा यांनी केले.
टाटा एज्यूकेशन विभाग महाराष्ट्र च्या प्रमुख मालविका झा, टाटा ट्रस्ट्सची एक सहयोगी संस्था असणारी कलिके संस्थेच्या प्रतिनिधीनी माण तालुक्यातील राजवडी गावातील राजवडी अंगणवाडी व उमाजीनगर अंगणवाडी (राजवडी)
या अंगणवाड्यांना नुकत्याच भेटी देऊन तेथील सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधून पाहणी केली, त्या वेळी त्या बोलत होत्या. कलिके संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अशोक के, माल्लामा बी, तारासिंग जे, वरिष्ठ समन्वयक गिरीश आर, तालुका समन्वयक शांताम्मा, मुद्देश, बालक शिक्षण कार्यक्रम अधिकारी कोटरेश वाय, बाल विकास विभाग प्रमुख चिटकालांबा एन, प्रगतीची, प्रकल्प अधिकारी राहूल मुळीक, प्रकल्प समन्वयक तथा कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, प्रकल्प सहाय्यक नम्रता भोसले, अंगणवाडीच्या सेविका निलम जगदाळे, पल्लवी यादव, मदतनीस जयश्री भोसले आदींची उपस्थिती होती.
प्रगत शिक्षण संस्थेने केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील २०५ व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५० अंगणवाड्यांसोबत बालशिक्षणात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे माण तालुक्यातील अंगणवाडीमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. बालशाळेची वर्गरचना ते बाल शिक्षणातील सेविका व मदतनीस यांची समज वाढली असून त्याचे परिणाम म्हणून अंगणवाडीमध्ये गुणवत्ता पूर्ण बालशिक्षण दिले जात आहे असे स्पष्ट करून मालविका झा यांनी अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धत, खेळाचे प्रकार, वयोगटा नुसार शिकविण्याचे नियोजन, पुस्तकांचा वापर, गोष्टी शिकविण्याची पद्धत, गाण्यांचे स्वरूप, आनंद व मनोरंजन, अभिनय गीत, अंगणवाडीत घेण्यात येणारे उपक्रम, सेविका व मदतनीस यांची प्रशिक्षणे, ॲक्टिविटी किट, इतर साहित्य, प्रकल्प सहाय्यक व प्रकल्प अधिकारी भेटी, प्रगत शिक्षण संस्थेचा बालशिक्षण कार्यक्रम व त्यांचा प्रत्यक्ष वापर याबाबत माहिती घेऊन संवाद साधला व मार्गदर्शनही केले.

