
फलटण : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याची तसेच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याची संधी मिळते असे प्रतिपादन संस्थेचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, फलटण येथे युवा महोत्सवाचा शुभारंभ संजीवराजे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑल इंडिया चॅम्पियन कुस्तीपटू पैलवान विकास गुंडगे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शिरीष भोसले, शिवाजीराव घोरपडे, पराग दोशी, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे आदींची उपस्थिती होती.
यावेळी जल्लोषात संपन्न झालेल्या या युवा महोत्सवामध्ये एक हजार ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला. महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ॲथलेटिक, कॅरम, बुद्धिबळ अशा विविध प्रकारातील क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर डान्स, गायन, नाटक, आर्ट गॅलरी आणि ट्रॅडिशनल डे यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा महोत्सव उत्सहात व जल्लोषात पार पडला.

