
फलटण : सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आकस्मिकपणे भेटी देऊन शाळेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘व्हिलेज गोज टू स्कूल’ या इंग्रजी विषय उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य पाहून त्यांना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शाबासकीची थाप ही दिली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या भेटी वेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, पोलीस निरीक्षक दराडे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार दंडिले, केंद्रप्रमुख महादेव कदम आदींची उपस्थिती होती.
या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी माण तालुक्यातील कासारवाडी, मलवडी, आंधळी या विविध शाळांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी माण तालुक्यामध्ये नव्याने सुरू असलेला ‘व्हिलेज गोज टू स्कूल’ या इंग्रजी विषय उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

कासारवाडी येथे ‘व्हिलेज गोज टू स्कूल’ या शैक्षणिक उपक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी कासारवाडी शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी सुसंवाद साधला. तसेच उपक्रमाविषयी सविस्तर माहितीही जाणून घेतली. दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य व तयारी पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप दिली. त्याचबरोबर आंधळी व मलवडी शाळेमध्ये सुरू असलेले BALA (Building As a Learning Aid) बाला पेंटिंग व मुलांचे संगणक ज्ञान, प्रात्यक्षिकची माहिती घेत बालचमुंचे मनोबल वाढविले. मलवडी येथील शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी इंग्रजीतुन या उपक्रमाचे विवेचन केले. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या दहावी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी मलवडी येथील त्रिंबकराव काळे विद्यालय या परीक्षा केंद्रास भेट देऊन तेथील पाहणी केली.

