
फलटण : साखरवाडी ता. फलटण येथील बौद्ध समाजाला बुद्ध विहारासाठी शासनाने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व रामोशी समाज संघटना यांच्या वतीने ॲड. राजू भोसले व ॲड. राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली फलटण उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना देण्यात आले.
यावेळी चर्चा करताना ॲड. राजू भोसले यांनी बुद्धविहाराच्या जागेबाबत महसूल विभाग सहकार्य करीत असले तरी भूमी अभिलेख कार्यालय मात्र दिरंगाईचे धोरण अवलंबवीत असल्याचे प्रांत अधिकारी विकास व्यवहारे यांच्या निदर्शनास आणून दिले व भूमी अभिलेख कार्यालयाने महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्हेवाट) नियम १९७१ अन्वये जागा मागणीच्या अनुषंगाने सदर गटाची मोजणी करून मोजणी नकाशा शासनाकडे पाठवणे गरजेचे असून सदर मागणी भूमी अभिलेख कार्यालय फलटण यांनी तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी केली.
निवेदन देताना नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, ॲड. राहुल मदने, साखरवाडी ग्रामपंचायत सदस्य दयानंद मागाडे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम औचरे, मयूर सोनवणे, गोपी कांबळे आदींची उपस्थिती होती.

