
फलटण : फलटण आगारात नुकत्याच दहा नवीन बसेस दाखल झाल्या आहेत, या बसेस जणू काही आमच्याच पत्रामुळेच आल्या असे विरोधक सांगत आहेत. वास्तविक राज्य शासनाने राज्यभरात ज्या ज्या आगारांना बसेसची आवश्यकता आहे तिथं तिथं अशा प्रकारच्या नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसारच फलटण आगारालाही नवीन बस प्राप्त झाल्या आहेत. आज पत्र दिलं आणि लगेच एक दोन दिवसात नवीन बसेस आल्या असे होत नाही हे जनतेच्या निश्चितपणे लक्षात येईल असा विश्वास व्यक्त करून नवीन बसेसची आमची मागणी जुनीच असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना दीपक चव्हाण म्हणाले, गेल्या दोन-तीन महिन्यात फलटण तालुक्यात जी काही पूर्वीची विकास कामे होत आहेत त्यांचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत. नुकत्याच फलटण आगाराला दहा नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यांचेही श्रेय त्यांनी घेण्याचा प्रयत्न करणे हा त्याचाच एक भाग आहे. वास्तविक पाहता फलटण आगारासाठी नवीन बसेसची आमची मागणी फार पूर्वीची आहे. या पूर्वीही नवीन बसेस आल्या आहेत पण आम्ही त्याची प्रसिद्धी केली नाही. २०२१-२२ सालापासून आम्हीही नवीन बसेसची मागणी करीत आहोत. त्या काळामध्ये आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकाही पार पडल्या होत्या. परंतु तत्कालीन सरकारकडून याबाबत कोणताही दुरोगामी निर्णय घेण्यात आलेला नव्हता. गेल्या पाच वर्षांमध्ये आपण सत्तेमध्ये आणि विरोधातही काम पाहिले आहे. आपण नवीन बसेसची मागणी केली होती. परंतु तत्कालीन शासनाकडून याबाबत निर्णय न झाल्याने आपली मागणी प्रलंबित राहिली असल्याचे चव्हाण यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. फलटण आगाराला नुकत्याच ज्या नवीन १० बसेस प्राप्त झालेल्या आहेत, त्या केवळ फलटण आगारालाच मिळालेल्या आहेत असे नाही तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक आगाराला अशा प्रकारच्या नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाने दुरोगामी निर्णय घेत ज्या ज्या आगारांना बसेसची आवश्यकता आहे तिथं तिथं अशा प्रकारच्या नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा पद्धतीच्या नवीन बसेस येणं हे काही नवीन नाही. गेल्या तीस वर्षाच्या काळामध्ये अनेक वेळेला फलटण आगारामध्ये बसेस आलेल्या आहेत परंतु त्याची आम्ही कधीही प्रसिद्धी केली नाही. मात्र काल ज्या १० नवीन बसेस आल्या त्या जणू काही आमच्याच पत्रामुळे आल्या असे त्या ठिकाणी सांगितलं गेले. परंतु नवीन बसेस मिळण्याची कारवाई ही काही लगेच चार दोन दिवसात होत नसते, आज पत्र दिलं आणि लगेच एक दोन दिवसात नवीन बसेस आल्या असे होत नाही असे स्पष्ट करून नवीन बसेसची आमची मागणी ही फार पूर्वीची व आवश्यकतेनुसार होती असेही दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. फलटण बस स्थानक बारामतीच्या धर्तीवर करणार असं वक्तव्य आमदार सचिन पाटील यांनी केलं त्यावर बोलताना ते म्हणाले, तसे होत असेल तर निश्चितपणे ते करायला हवे. चांगल्या विकास कामांना आमची हरकत असण्याचे कारण नाही. परंतु जर आपण फलटण बस स्थानकाची आजची परिस्थिती पाहिली तर त्याचे यापूर्वी बरेचसे काम झाले आहे. मागील काळामध्ये सुमारे चार ते पाच कोटी रुपये निधी मंजूर करून त्यामधून संपूर्ण बसस्थानकामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे व अन्य नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे बस स्थानकाची आजची परिस्थिती पाहता या बसस्थानकामध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्याचे आपणास दिसून येते. पूर्वी तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साठवून चिखल होत होता, परंतु आज तिथे ती परिस्थिती नाही. या बस स्थानकातच असलेल्या बारामतीकडे जाणाऱ्या गाड्यांच्या छोटेखानी बस स्थानकाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत फलटण बस स्थानकाची आजची परिस्थिती अतिशय व्यवस्थित आहे. या व्यतिरिक्त आणखीन आवश्यक सुधारणा करण्यास आमचा नकार नाही. जनतेने विद्यमान आमदारांना संधी दिल्याने त्यांनी विकासात्मक कामे करण्याबाबत आमचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु फुकटचं श्रेय घेऊन लोकांची दिशाभूल करणे त्यांनी थांबवाव अशी अपेक्षाही माजी आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

