
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथील बी.टेक. (कंप्युटर अभियांत्रिकी) शाखेतील विद्यार्थी संकेत पवार याने नोव्हार्टिस फार्मास्युटिकल कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या NEST (Nurturing Excellence, Strengthening Talent) या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. अंतिम फेरीत त्याने विजय मिळवावा यासाठी त्याला महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांनी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत संकेत पवार याने पहिल्या दोन फेऱ्या यशस्वीपणे पार करून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. अंतिम स्पर्धेत संकेत समोर प्रतिस्पर्धी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू आणि BITS स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मुंबई येथील विद्यार्थ्यांचे आव्हान असणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्यांना v उपविजेत्यांना अनुक्रमे एक लाख ५० हजार रुपये व ७५ हजार रुपये अशी रोख रकमेची बक्षीशे देण्यात येणार आहेत.
संकेतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल व त्याने अंतिम फेरीत विजय मिळवावा यासाठी त्याला फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांच्यासह महाविद्यालय, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिवाराकडून अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

