फलटण : फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याला संस्थांनचा वारसा आहे. गेल्या तीन पिढ्यापासून राजे कुटुंब राजकारणामध्ये कार्यरत आहे. आजवरच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा डाग लागलेला नाही. अशा पद्धतीने व अशा प्रकारची कारवाई होणे या संस्कृतीत अपेक्षित नाही त्यामुळे आम्ही सर्वजण तालुक्याच्यावतीने या कारवाईचा निषेध करतो असे प्रतिपादन माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची चौकशीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानासमोर पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार चव्हाण यांनी सदर निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना दीपक चव्हाण म्हणाले, सदरची कारवाई ही राजकीय स्वरूपाची आहे असे वाटत नाही. आम्ही सर्वजण तालुक्याच्यावतीने या कारवाईचा निषेध करतो. अशा पद्धतीने व अशा प्रकारची कारवाई होणे या संस्कृतीत अपेक्षित नाही. कारण गेली तीन पिढ्या राजे कुटुंब राजकारणामध्ये कार्यरत आहे. स्व. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व स्व. शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा वारसा आमदार रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांची पुढील पिढी समर्थपणे चालवीत आहे. या सर्वांच काम पाहता त्यांनी नेहमीच समाजाच्या हिताला प्राधान्य दिल्याचे व सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून येते. शेतीचे पाणी ते औद्योगिकरणापर्यंतचे सर्व काम त्यांनी केले आहे. आजवरच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा डाग लागलेला नाही. अश्या पद्धतीचे स्वच्छ चारित्र्याचे राजकारण त्यांनी केले असताना, ज्यावेळी अशा पद्धतीची कारवाई होते त्यावेळी निश्चितपणे या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. ही कारवाई राजकीय आहे की नाही हे सांगता येणार नाही परंतु अशा प्रकारची कारवाई अपेक्षित नाही. आयकर की ईडी अशा अफवा याबाबत काही सांगता येणार नाही कारण देशात काय चालू आहे हे आपणास माहिती आहे. याचा अर्थ तालुक्यामध्ये तशाच प्रकारची कारवाई आहे काय हे आत्ताच सांगू शकत नाही असे ही चव्हाण यावेळी म्हणाले.