फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे “एआय आणि एआय टूल्सचे अनुप्रयोग” या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचा शुभारंभ करण्यात आला असून ISTE, IEI आणि DBATU लोणेरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.नरेंद्र नार्वे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मुधोजी महाविद्यालयाचे कम्प्युटर व मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. सचिन लामकाने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य प्रा.डॉ. नरेंद्र नार्वे हे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमात आघाडीची आयटी सोल्युशन्स कंपनी असलेल्या टेक्नोविंग्स इंडिया, मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बाहुबली कंदाले, आणि वरिष्ठ विकासक व कॉर्पोरेट प्रशिक्षक अख्तर नदाफ यांचे अनुक्रमे “एआय तंत्रज्ञानाच्या संधी आणि आव्हाने” व “वास्तविक एआय टूल्सचा वापर” या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या उपयोगावर तसेच शिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा यावर मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील ८५ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला असून आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात एआयच्या विविध क्षेत्रांतील उपयोग आणि अध्यापनातील तंत्रज्ञान समजून घेण्यावर भर दिला जाणार आहे.