फलटण : केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे स्वामित्व योजना प्रभावीपणे राबवत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेशीर स्वत:चे मालमता पत्रक मिळत आहे. ही योजना अंमलबजावणी करुन शासनाने उचलले क्रांतीकारक पाऊल आहे. यातून ग्रामीण भागाचा विकास होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
दूरदृष्य प्राणलीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० लाख मालमता पत्रकांचे आभासी वितरण करुन लाभार्थ्यांना संबोधित केले. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरावरील लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रक वितरण सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. वसंत निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.
ड्रोनद्वारे साडेपाचशे गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यांचे डिजीटल नकाशे तयार झाले आहेत, असे सांगून बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, ५०० गावांचे काम अपूर्ण आहे, ते येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. डिजीटल नकाशे मालमत्ता पत्रकामुळे ग्रामीण भागातील जमिनीचे वाद-विवाद मिटणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना कायद्याने वैध असे मालमत्ता पत्रक मिळणार आहे. अशा प्रकारचा पथदर्शी कार्यक्रम हा महाराष्ट्रात पहिल्यांदा राबविण्यात आला असून तो केंद्र शासन संपूर्ण देशात राबवित आहे.
सातारा जिल्हा हा नेहमीच शासनाच्या विविध योजना प्रभाविपणे राबविण्यात राज्यात अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठीही प्रयत्न करणार आहे. सातारा येथील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग यावेत अशी नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे उद्योग आणण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध असून याला प्रशासनानेही सहकार्य करावे, अशी अपेक्षाही मंत्री भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतातील नागरिक हे जास्त करुन ग्रामीण भागात राहत आहे. स्वामित्व योजनेमुळे त्यांना कायद्याने वैध असे मालमत्ता पत्रक मिळणार आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. ही योजना देशभरात लागू झालेली आहे. जिल्ह्यातील ५०२ गावांची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे. मोजणीमुळे वाद विवाद मिटणार असून गावातील रस्त्यांसह गावाचा संपूर्ण विकास होण्यास मदत होणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.