फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण महाविद्यालयास ‘नॅक ए ग्रेड’ व ‘एनबीए’ मानांकन मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. यासाठी प्राचार्य व समस्त प्राचार्यांचे सामूहिक प्रयत्न, कष्ट कारणीभूत ठरले आहेत. अगामीही काळात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण अधिकाधिक यश मिळवेल व अभियांत्रिकी क्षेत्रात एक वेगळी उंची गाठेल असा विश्वास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे महाविद्यालयाला ‘नॅक ए ग्रेड’ व ‘एनबीए’ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा शुभारंभ संजीवराजे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख होते. या प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमणलाल दोशी, सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, शिरीष भोसले, शरदराव रणवरे, शिवाजीराव घोरपडे, नितीन गांधी, रणजीत निंबाळकर, पराग दोशी, सी.डी. पाटील, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी प्रा.अमरसिंह रणवरे यांनी एनबीए मानांकनाबाबतची माहिती दिली. प्रा. गोविंद ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या अद्ययावत सुविधांची माहिती उलगडली. प्रा. अभिजीत हिप्परकर यांनी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसची ओळख करून दिली. प्रा. महेश घाडगे यांनी इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला. प्रा. रोहन कोळपे यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलची माहिती दिली. प्रा. प्रतिमा भोसले व प्रा. रुजल दोशी यांनी सुत्रसंचलन केले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. शांताराम काळेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी विविध कंपन्यांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.