फलटण : समस्त फलटण तालुक्याचे डोळे लागून राहिलेल्या आळजापूर ता. फलटण येथील दारूबंदीच्या निर्णायक लढ्यात अखेर नारी शक्तीचा विजय झाला असून येथील दारूची बाटली आडवी अर्थात दारूचे दुकान बंद करावे यासाठी महिलांनी एकी दाखवत मतदान केले. या मतदान प्रक्रियेत एकूण ७२३ महिला मतदारांपैकी ४८० महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४५४ मतदान आडव्या बाटलीच्या बाजूने तर उभ्या बाटलीच्या बाजूने १९ मतदान झाले तर ७ मते बाद झाली.
दरम्यान व्यसनमुक्त चळवळीचे विलास जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ नेते विलासराव नलवडे व सरपंच शुभम नलवडे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारण्यात आला होता व तो यशस्वी ठरला.
कोणतीही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूम व बियर बार या दुकानाला परवानगी दिल्याचा आरोप करून आळजापूर येथील महिला, ग्रामस्थ, तरुण व ग्रामपंचायत यांनी आपल्या गावात दारुचे दुकान नको अशी भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी सातारा यांना गावातील महिलांनी सह्यांचे निवेदनही दिले होते, त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिलांच्या सह्यांची पडताळणी करुन २५ % पेक्षा अधिक महिला मतदारांची बंदीची मागणी असल्याने जिल्हाधिकारी यांनी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी या गावात मतदानाची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये ग्रामपंचायत आळजापूर येथे दारूबंदी निर्णया बाबतची मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत गावातील ७२३ महिला मतदारा पैकी ४८० महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये ४५४ महिलांनी आडव्या बाटलीच्या बाजूने तर १९ महिलांनी उभ्या बाटलीच्या बाजूने कौल दिला तर ७ मते अवैध ठरली. यावेळी निवडणूक पर्यवेक्षण अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी काम पहिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दारू बंदीच्या बाजूने निकाल येताच महिला व ग्रामस्थांनी मोठा जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला. तरुणांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजीही केली.
दारूबंदीसाठी सरसावल्या ९४ वर्षांच्या आज्जी
आळजापूर येथील दारूबंदीच्या विरोधात महिलांनी उभारलेल्या या लढ्याच्या निकालाकडे समस्त तालुक्याचे लक्ष लागले होते. दारूबंदी करायचीच असा नेटका निर्धार महिलांनीही केला होता. यावेळी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत ९४ वर्षीय लक्ष्मी काशिनाथ काकडे यांनीही मतदान केले. निकाला नंतर महिलांनी उभारलेला दारूबंदीचा लढा किती निकराचा व निर्धारचा होता हे स्पष्ट झाले.