‘मॅरेथॉन’ जनता दरबाराला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद ; राजकारण आमचा उद्देश नाही अगामी जनता दरबार ‘झिरो पेंडन्सी’ असेल : आमदार सचिन पाटील

फलटण : आम्हाला राजकारण करायचे नसून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न, समस्या, तक्रारी घेऊन येणाऱ्यांची गर्दी आम्हाला आमच्या बंगल्यावर नको आहे. लोकांच्या तक्रारी कायम राहिल्या पाहिजेत. तक्रारींवर तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत व त्या सोडविण्यासाठी आमच्या बंगल्यांवरती लोकांची गर्दी जमली पाहिजे असा आमचा मुळीच उद्देश नाही. फलटण विधानसभा मतदारसंघातील जनतेमधील शेतकरी, सर्वसामान्य जनता, व्यापारी, तरुण वर्ग, विद्यार्थी, महिला आदी घटकांना त्यांचे प्रश्न, तक्रारी, समस्या घेऊन आमच्या बंगल्यांवर येऊ लागू नये हा आमचा मुख्य उद्देश आहे. मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. अगामी जनता दरबार ‘झिरो पेंडन्सी’ असेल अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय, निमशासकीय विभागाच्या कार्यालय प्रमुख यांची आढावा बैठक, नागरिक संवाद आणि समस्या निराकरण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन फलटण येथे आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीचा तथा जनता दरबाराचा समारोप करताना ते बोलत होते.
आज प्रथमच भरविलेल्या जनता दरबारास नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आगामी सहा महिन्यांमध्ये ज्यावेळी पुन्हा जनता दरबाराचे आयोजन करण्यात येईल. त्यावेळी तो जनता दरबार झिरो पेंडन्सी असला पाहिजे, त्यावेळी या हॉलमध्ये सर्व खुर्च्या रिकाम्या दिसल्या पाहिजेत. एकही नागरिक दिसला नाही पाहिजे, त्यांच्या सर्व तक्रारींचे समस्यांचे निवारण झाले पाहिजे हाच माझा उद्देश असून, तसा विश्वास मी या तालुक्यातील जनतेला देतो, असे बोलून आ. पाटील म्हणाले, मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी समस्या जाणून घेणे व त्यांचा निपटारा करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीद्वारे आपले प्रश्न व समस्या घेऊन आलेले उपस्थित ८० टक्के नागरिकांचे प्रश्न आपण सोडवू शकलो याचे समाधान नक्कीच आहे. त्याचबरोबर उर्वरित २० टक्के नागरिकांच्या समस्या, प्रश्न अद्याप राहिले आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्या त्या विभागाचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी निश्चितपणे प्रयत्न करतील व संबंधितांना न्याय देतील असा विश्वासही आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला व जनतेचे प्रश्न तडीस नेल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी वर्गाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

गेल्या तीस वर्षांमध्ये आपल्या समस्या सोडविण्यासाठी दाद मागायची कुठे हा प्रश्न लोकांसमोर होता. या जनता दरबाराच्या माध्यमातून आपले प्रश्न समस्या व तक्रारी मांडण्याची एक चांगली संधी व व्यासपीठ जनतेला मिळाले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न सुटल्याने हा भरविण्यात आलेला जनता दरबार लोकांच्या हिताचाच आहे हे स्पष्ट झाले आहे. आगामी काळातही प्रशासकीय पातळीवरील आपले प्रश्न समस्या अथवा तक्रारी यांची सोडवणूक करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत व मनस्ताप सहन करावा लागणार नाही याबाबत आम्ही सजग व कार्यरत राहू अशी ग्वाही देत विविध विभागातील अधिकाऱ्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष सूचनाही केल्या.
महाराजा मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता या आढावा बैठकीला तथा जनता दरबाराला प्रारंभ झाला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे सदस्य माणिकराव सोनवलकर, ॲड. नरसिंह निकम यांच्यासह प्रांत अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, पोलिस उप अधीक्षक राहूल धस यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
जनता दरबारामध्ये या विभागांसाठी विचारण्यात आले एवढे प्रश्न –
क्रीडा १, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १, उप प्रादेशिक परिवहन २, कृषी २, निरा उजवा कालवा ४, सहाय्यक निबंधक कार्यालय ७, वण विभाग ७, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ७, धोम बलकवडी पाटबंधारे १०, पोलीस १६ (शहर ६, ग्रामीण १०), भूमी अभिलेख २९, सार्वजनिक बांधकाम ३५, पंचायत समिती ६१, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ६४, फलटण नगरपरिषद ६५, महसूल विभाग १८३
या व्यतिरिक्त नोंदणी न करता ऐनवेळीही अनेकांनी आपले प्रश्न, समस्या उपस्थित केले.

तब्बल नऊ तास चाललेल्या या जनता दरबारामध्ये फलटण शहारासह ग्रामीण भागातूनही शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या समस्याची मांडणी केल्या नंतर त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ निवारण केले तर काहींना ठराविक कालावधीत त्या सोडविण्याची हमी दिली. या जनता दरबारात वर्षानुवर्षे वर्षे हेलपाटे मारूनही न सुटलेल्या तक्रारीचे निवारण तात्काळ झाल्याने व काहींना त्या सुटण्याच्या आशा पल्लवीत झाल्या, त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. या बैठकी वजा जनता दरबारामध्ये सुमारे साडेपाचशे तक्रारी, समस्या, प्रश्न नागरिकांनी मांडले. त्यामधील बहुतांशी तक्रारीचा निपटारा करण्यात आला. तब्बल नऊ तास चाललेला हा जनता दरबार अनेक नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील ग्रामस्थांना न्याय व दिलासा देणारा ठरला असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी घटनास्थळावर व्यक्त केल्या.
श्रीरामचा प्रश्न विधानसभेत मांडणार !
यावेळी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत कारखान्यात भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत या कारखान्याने जमीन विक्री करताना शासनाच्या अटी व शर्तीचे पालन केले नाही. विक्री करताना मूल्यांकन तक्ता (रेडी रेकनर) शहराऐवजी ग्रामीणचा वापरला. कारखाना तोट्या बाहेर येऊनही निविदा न काढता पुन्हा त्याच उद्योगाला चालविण्यास दिला. अनामत रकमेवर व्याज देण्याची चुकीची संकल्पना करारामध्ये करण्यात आली असे विविध मुद्दे सविस्तर विषद केले. त्यावर आमदार सचिन पाटील यांनी श्रीराम कारखान्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून याबाबतची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आपण करणार असल्याचे स्पष्ट केले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी, सूत्रसंचलन निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी केले. आभार तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी मानले.
यावेळी फलटण शहर व तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!