फलटण : यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण व एअर गुरुजी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ), कोडींग, ड्रोन, रोबोटिक्स क्षेत्रातील भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ आज ( दि. १० ) रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे होणार आहे. फलटण तालुक्यामध्ये प्रथमच अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत हे प्रदर्शन होणार असून सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सूर्यवंशी (बेडके) या भूषविणार आहेत. यावेळी संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, एअर गुरुजी इंटरनॅशनलचे प्रताप पवार, राजेंद्र खवळे आदी मान्यवर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
फलटण तालुक्यात तालुकास्तरावरती प्रथमच अशा विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरणार असून या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.