फलटण : आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा आपले आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्र समस्या यासारख्या विविध आजरांनी अनेकजण त्रस्त आहेत. मधुमेह बाळावला तर त्याचा आपल्या दृष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे वाहन चालकांनी सजग, सुदृढ, निरोगी व अपघातमुक्त रहाणे आवश्यक असल्याचे मत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण येथील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अक्षय खोमणे यांनी व्यक्त केले.
रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण व उपजिल्हा रुग्णालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहन चालकांना मार्गदर्शन करताना खोमणे बोलत होते. या प्रसंगी ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, नेत्र चिकित्सक डॉ. ऋतुजा सोळसकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे, सागर लाळगे, करण लेंबे, ए एस घुले, विठ्ठल कोळी आदींची विशेष उपस्थिती होती.
यावेळी वाहन चालकासाठी निरोगी व सुदृढ आयुष्य का व कसे महत्वपूर्ण आहे याबाबत मार्गदर्शन करून वाहन चालकांनी आपला फलटण व माण तालुका अपघातमुक्त ठेवावा असे आवाहन अक्षय खोमणे यांनी वाहन चालकांना केले.
सदर मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये फलटण शहर व परिसरातील रिक्षा, टेम्पो, शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांचे चालक, जड वाहनासह विविध प्रकारच्या वाहनांचे चालक व मालक यांनी मोठ्या संख्येने आपली नेत्र व आरोग्य तपासणी करून घेतली.
सदर आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमास फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना, टेम्पो चालक-मालक संघटना, स्कूल व्हॅन चालक मालक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य व विविध वाहनांचे चालक मालक उपस्थित होते.