फलटण : फलटण तालुक्यात रब्बी हंगामाची पेरणी अंतीम टप्प्यात आहे, त्यामध्ये बहुतांश गहू हरभरा, मका इत्यादी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत पिकांसाठी लागणारे युरिया खतासोबत लिंकिंग म्हणून इतर खते देणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाच्या माध्यमातून आज प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव व पंचायत समितीचे कृषी अधिकारी नवनाथ फडतरे यांच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात आली.
युरिया सोबत मागणी नसतानाही अन्य खते घ्यायला सक्ती करणाऱ्यांविरुध्द करण्यात आलेल्या कारवाई मध्ये रक्कम रुपये ३ लाख, ४८ हजार, ८७५ रुपये इतक्या रकमेच्या लिंकिंग खतास विक्री बंद आदेश देण्यात आला.
रासायनिक खते, बी – बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावी, शिफारशीप्रमाणे खतांचा संतुलित वापर करावा, खरेदी केलेल्या निविष्ठांची पक्की पावती घ्यावी, एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभाग पंचायत समिती येथे लेखी स्वरुपात तक्रार द्यावी असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव यांनी केले आहे.
रासायनिक खताची ज्यादा दराने किंवा युरिया सोबत इतर खतांची लिंकिंग ( मागणी नसतानाही अन्य खते घेण्याची सक्ती ) केल्यास संबंधीत कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल याची नोंद घ्यावी अशा स्पष्ट सूचना पंचायत समिती फलटण येथील गुण नियंत्रण निरीक्षक नवनाथ फडतरे यांनी दिल्या आहेत.