फलटण : जागेसह खरेदी केलेल्या घराची नोंद सातबारा उताऱ्यावरती लावली असल्याचे सांगून एक हजार रुपयांची मागणी करून पाचशे रुपयांची लाच घेताना फलटण चावडीतील महसूल सेवक तथा कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून त्याच्या विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक दौलतराव उदंडे व ४९ रा. कसबा पेठ, फलटण असे लाच घेताना सापडलेल्या कोतवालाचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदाराने खरेदी दीड जागेसाहीत खरेदी केलेल्या घराची नोंद सातबाऱ्याला व्हावी यासाठी फलटण चावडी येथे अर्ज केला होता. सदर नोंद झाल्यानंतर तेथील महसूल सेवक तथा कोतवाल दीपक उदंडे याने तक्रारदारास तुम्ही जागेसाहीत खरेदी केलेल्या घराची नोंद सातबाऱ्यावर मीच करून घेतली आहे असे सांगितले व त्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती पाचशे रुपयांची मागणी करून ती स्विकारताना दीपक उदंडे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात रांगेहाथ सापडला. त्याच्या विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस हवालदार गोगावले, पोलिस नाईक गणेश ताटे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.
कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी केल्यास त्याची तक्रार पोलिस उपअधिक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बझार सातारा येथे संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.