शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज : महेश मांजरेकर

फलटण : शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज बनल्याचे स्पष्ट करताना या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्वच स्पर्धक हे विजेते असल्याचे नमूद करीत आपण स्वतः पुढील वर्षी ‘फलटण मॅरेथॉन स्पर्धेत’ सहभागी होणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., आणि फलटण रोबोटीक सेंटर आयोजित आपली फलटण मॅरेथॉन २०२४ – २५ या स्पर्धेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी फ्लॅग ऑफ करुन सकाळी केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धक सादिया सय्यद, प्रा. शामराव जोशी, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्याप्रसंगी मांजरेकर बोलत होते.
फलटण सारख्या निमशहरी गावात गेल्या ७ वर्षापासून डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि त्यांचे सहकारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करुन तरुणांना शारीरिक व्यायामाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल आपणास समाधान वाटत आहे. डॉ. प्रसाद जोशी यांच्या सामाजिक कार्याला आपला सलाम असल्याचे सांगत, डॉ. प्रसाद जोशी यांनी सांधेरोपण केलेले ज्येष्ठ स्त्री – पुरुष या स्पर्धेत सहभागी झाले हे कौतुकास्पद आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून फलटण मॅरेथॉन स्पर्धकांनी राज्य व देश पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी महेश मांजरेकर यांनी केले.

डॉ. जोशी यांची आरोग्य संवर्धनाची प्रेरणा कौतुकास्पद : आ. जयकुमार गोरे
उत्तम आरोग्य, शरीर तंदुरुस्त असेल तर मानसिक दृष्ट्या मजबुत राहता आल्याने आपले जीवन सुखकर होते ही संकल्पना घेऊन डॉ. प्रसाद जोशी गेली ७ वर्षे आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करतात आणि तरुणासोबत सर्व वयोगटातील स्त्री – पुरुष नागरिकांना आरोग्य संवर्धनाची प्रेरणा देतात हे कौतुकास्पद असल्याचे सांगत सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात नियमीत व्यायामासाठी थोडा वेळ काढा, लवकर झोपा, लवकर उठा, आवश्यक तेवढेच खा हा मंत्र डॉ. जोशी या मॅरेथॉनचे माध्यमातून देतात त्याचे पालन करा असे आवाहन ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केले.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील नामवंतांना पाचारण करुन त्यांचे विचार, त्यांचे आदर्श समाजासमोर विशेषतः तरुण पिढी समोर ठेवण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करीत आहोत. ‘आपली फलटण मॅरॅथॉन’ स्पर्धेमध्ये फलटण,
सातारा, कराड, वाई, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला, नागपूर, पुणे आणि मुंबई येथून विविध वयोगटातील सुमारे १३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
डॉ. सौ. प्राची जोशी यांनी समारोप आभार प्रदर्शन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!