फलटण : कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच व श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील २५ वी (रौप्य महोत्सवी) अर्थशास्त्र सहकार परिषद दिनांक ११ व १२ जानेवारी रोजी श्रीमती कनिष्ठ न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अर्थशास्त्र राज्य विचार मंचाचे समन्वयक प्रा. सतीश जंगम यांनी दिली.
दिनांक ११ जानेवारी रोजी शिक्षण विकास मंडळ देवगडचे अध्यक्ष जनार्दन तेली यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. एस. के. ढगे यांचे बीजभाषण होणार आहे. यावेळी शिक्षण विकास मंडळ देवगडचे कार्यवाह वैभव बिडये, नियमक समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली व देवगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनूरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिक्षकांनी लिहिलेल्या शोधनिबंधावर ‘अर्थवेध’ या नियतकालिकाचे प्रकाशन होणार आहे.
या परिषदेत कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील अर्थशास्त्र, सहकार विषयाचे अभ्यासक्रम, मूल्यमापन, प्रश्नपत्रिका अशा विविध स्तरावर चर्चासत्र आयोजित केली असून, दिनांक १२ जानेवारी रोजी अर्थवेध या नियतकालिकातील शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष शेती मित्र अशोकराव थोरात यांचे सहकार क्षेत्रावर तर कोकण परीक्षा मंडळ रत्नागिरीचे सदस्य डॉ. बालाजी सुरवसे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी डॉ. शरद शेटे व कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचार मंचचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयीनस्तरावर गेली २५ वर्षे सातत्याने अर्थशास्त्र, सहकार विषयाच्या अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन याबाबत परिषद आयोजित करून शिक्षकांना मार्गदर्शन करणारी कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच ही एकमेव संस्था असल्याचे सांगून या परिषदेस कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र, सहकार विषय शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन विचार मंचाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. शरद शेटे यांनी केले.