फलटण : फलटण पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फलटण शहरातील अभिजीत अरुण जाधव व आकाश भाऊसो सावंत या दोघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत अरुण जाधव वय २१ व आकाश भाऊसो सावंत वय २३ दोघेही रा. मलठण ता. फलटण यांच्यावर फलटण शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका व सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका या हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी पोलिस उप अधिक्षक राहुल धस यांनी केली होती. जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी या दोघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका व सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
दरम्यान नोव्हेंबर २०२२ पासून विविध कायदा कलमांन्वये एकूण १५४ व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून अगामी काळातही शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.