फलटण : पत्रकार हे समाजाच्या अपेक्षा पूर्ण करीत असताना पत्रकारांबद्दल ही समाजाचे काही कर्तव्य आहे. समाजातील इतर घटक जेव्हा पत्रकारितेचे कौतुक करतात, पत्रकारांच्या पाठीवर कौतुकाची जी थाप देतात त्याच्यातून पत्रकारांना पुढे जाण्याचं बळ प्राप्त होते. गेल्या काही वर्षात बिल्डर असोसिएशनने जी प्रगती केली आहे व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे ती कौतुकास्पद व प्रेरणादायक आहे. त्यामुळे बिल्डर व पत्रकार या दोन्ही संघटना एकत्र आल्या याचा आपला मनापासून आनंद होत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र कल्याण निधीचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन फरांदवाडी ता. फलटण येथील बिल्डर असोसिएशन ट्रेनिंग सेंटर येथे करण्यात आले होते, या सत्काराला उत्तर देताना अध्यक्षस्थानावरून बेडकीहाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दांडिले, माजी अध्यक्ष राजीव नाईक निंबाळकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, रमेश आढाव, युवराज पवार यांची उपस्थिती होती.
बिल्डर हे समाजासाठी अनेकांच्या स्वप्नातील घरांची बांधणी करीत असतात तर पत्रकार हे आपल्या लेखणीतून समाजाची बांधणी करीत असतात, तेव्हा दोन्ही बांधणी करणारे आज एकत्र आले आहेत म्हणून या समारंभाला अतिशय वेगळं महत्त्व आहे असे निदर्शनास आणून देत बेडकीहाळ यांनी सांगितले की, कोकणामधील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या दुर्गम भागातील गावातून मुंबई येथे जाऊन एलफिस्टन या गव्हर्नरच्या प्रेरणेने बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व विज्ञानाचे शिक्षण घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे प्रश्न इंग्लिश व अन्य भाषिक वृत्तपत्र मांडत होते. परंतु मराठी माणसाचे प्रश्न कोण मांडणार म्हणून मराठी माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असावे असं बाळशास्त्री जांभेकर यांना वाटले आणि स्वतःची काहीही ऐपत नसताना त्यांनी ६ जानेवारी १८३२ साली पाहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले. वास्तविक बाळशास्त्री जांभेकर हे इंग्रजांच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये पहिले भारतीय प्रोफेसर होते. इंग्रजांच्या सत्तेमध्ये ते नोकर होते. पण तरीसुद्धा इंग्रजांचं कुठे चुकतंय हे सांगण्याचं धाडस त्यांनी त्या काळात दर्पण वृत्तपत्रामधून केले.
पूर्वीची राजेशाही गेल्यानंतर जी लोकशाहीची नवीन चौकट तयार झाली. एका बाजूला लोकप्रतिनिधी व दुसऱ्या बाजूला कायदे राबवणारे प्रशासन यांच्यामध्ये कोण चुकतंय हे सांगण्याची परंपरा बाळशास्त्री जांभेकरांनी त्या वेळेपासून घालून दिलेली होती, त्या परंपरेला फलटण तालुक्यातील पत्रकार आजही बांधील आहेत. अनेक राजवटी आल्या गेल्या परंतु फलटण तालुक्यातील पत्रकारिता कोणालाही बधली नाही असे बेडकीहाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सर विश्वेश्वरैया मोक्षगुंडम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी प्रस्ताविकामध्ये अध्यक्ष किरण दांडिले यांनी असोसिएशनने राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. असोसिएशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी त्याकाळी आसूडच काढला होता. सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी प्रयत्न केले तर महात्मा फुले यांनी दिन दलित, गरीब समाजावर जो अन्याय करेल त्यांच्यावर आसूड ओढण्यासाठी त्यांनी ‘आसूड’ नावाचेच वृत्तपत्र सुरू केल आणि नंतरच्या काळात ‘दीनबंधू’ सुरू केले. अशा सावित्रीबाई फुले यांचे स्मरण ठेवणं ही बिल्डर असोसिएशनची एक प्रकारची सामाजिक बांधिलकीच असल्याचे रविंद्र बेडकीहाळ या वेळी म्हणाले.
फलटण तालुक्यामध्ये सर विश्वेश्वरय्या यांचे योगदान फार वेगळ आहे. फलटण संस्थान काळात भाटघर धरणाचा कालवा फलटण संस्थानमधून न्यायचा होता, तेव्हा त्याबाबत श्रीमंत मालोजीराजे यांनी या कामाला सहकार्य करावे असे पत्र सातारचे डेप्युटी गव्हर्नर यांच्याकडून पाठवण्यात आले होते. मालोजीराजांनी त्यांना सांगितले की तुम्ही तो कलवा बांधा परंतु त्याचा लाभ माझ्या संस्थान मधल्या शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला किती होणार आहे हे मला समजल्या शिवाय मी आपणास परवानगी देणार नाही, आणि मग तिथे टाय पडला. त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्रिपक्ष समिती करूया आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या कामाच्या या कामाचे नियोजन करूयात असे सुचवले त्यासाठी काही नावे ब्रिटिश गव्हर्नरांनी सुचवली पण श्रीमंत मालोजीराजे यांनी विश्वेश्वरैया मोक्षगुंडम यांचे नाव सुचवले. कारण त्यावेळी म्हैसूरच्या वड्डीयार राजाने त्यांच्या सहकार्याने तेथे काही धरणे बांधली होती. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व त्यांची विद्वत्ता आपल्या कामी यावी याकरिता त्यांच्याकडूनच हा सर्व्हे करून घेऊन या कालव्याचे काम करूया हे मालोजीराजे यांचे म्हणने ब्रिटिश सरकारला ऐकावे लागले. आणि मग त्यांनी हा सगळा कालवा केल्याचे बेडकीहाळ यांनी यावेळी सांगितले.
स्व. आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्यापासून फलटणच्या उज्वल पत्रकारितेला सुरुवात झाली. त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असताना एकीकडे ते या लढ्याचे व दुसरीकडे ते पत्रकारांचे नेतृत्व करीत होते. हरिभाऊ निंबाळकर यांनी शिवसंदेश या वृत्तपत्राची केलेली उभारणी आम्ही जवळून पाहिली आहे. ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे विद्यापीठ असा स्व. आमदार हरिभाऊ निंबाळकर लौकिक आहे. त्यांच्या विद्यापीठामधून फलटणच्या ग्रामीण भागासह सातारा जिल्ह्यातील अनेक पत्रकार तयार झाले असल्याचेही यावेळी बेडकीहाळ यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
उपस्थितांचे स्वागत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी, सूत्रसंचालन स्वीकार मेहता व रणधीर भोईटे यांनी केले. आभार सहसचिव आनंदराव काळूखे यांनी मानले. कार्यक्रमास बिल्डर असोसिएशनचे जेष्ठ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, दिलीप शिंदे, यांच्यासह असोसिएशन आजी माजी पदाधिकारी, सदस्य व विविध साप्ताहिकांचे संपादक, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेलचे संपादक, प्रतिनिधी उपस्थित होते.