फलटण : अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत करून शिवसेनेची ताकद वाढवणार आहे. अगामी काळातील सर्व निवडणुका शिवसेना ताकतीने लढेल व आपली ताकत दाखवून देईल असे प्रतिपादन जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केले.
फलटण येथील विश्रामगृह येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीत मार्गदर्शन करताना राऊत बोलत होते.
हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आपली शिवसेना प्रत्येक घराघरात व प्रत्येकाच्या मनामनात पोहचली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपणास अगामी काळात येऊ घातलेल्या सर्व निवडणुका लढवायच्या आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक शिवसैनिकाने आपले पक्ष संघटन मजबूत करून पक्षीय ताकत वाढविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे व ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने ताकतीने कामाला लागावे असे आवाहन यावेळी सुधीर राऊत यांनी बैठकीत केले.
बैठकीस उपजिल्हा संघटक विश्वास चव्हाण, तालुकाप्रमुख विकास नाळे, तालुका संघटक विशाल जाधव, भारत लोहाना, नंदकुमार काकडे, शहर संघटक अक्षय तावरे, युवासेना उपतालुकाप्रमुख सौरभ गायकवाड यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक यांची उपस्थिती होती.