फलटण : फलटण शहरात दर रविवारी भरणारा बाजार जागेच्या कारणावरून चांगलाच चर्चेत आहे. गेल्या रविवारपासून फलटण शहरात असणाऱ्या मध्यवर्ती बाजारपेठेत पूर्वीप्रमाणे हा बाजार पुन्हा भरवला जात आहे, त्यास सर्व नागरिक , शेतकरी व व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्याबरोबरच सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा नगरपालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.
फलटण शहरातील महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते शासकीय अधिकार गृह ते केंजळे स्मारक ते गिरवी नाका या परिसरामध्ये दर रविवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार हा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर मागील रविवार पासून भरविण्यात येत आहे . सदर फलटण शहरातील मध्यवर्ती बाजार पेठ येथे भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजाराच्या नियोजनासाठी नगर पालिका कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . तसेच वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे नियोजन केलेले आहे .
खालील ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे.
▪️ गजानन चौक ( मधुमालती इमारत ) ते उमाजी नाईक चौक
▪️ उमाजी नाईक चौक ( ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस ) ते डेक्कन चौक
▪️ उमाजी नाईक चौक ते मेटकरी गल्ली
▪️ मेटकरी गल्ली ते शिवशक्ती चौक ( परिवार साडी सेंटर )
▪️ शिवशक्ती चौक ते अप्सरा साडी सेंटर ( रविवार पेठ )
▪️ शिवशक्ती चौक ते नरसिंह चौक
▪️ नरसिंह चौक ते शिवानी गिफ्ट हाउस
खालील ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येणार नाही
▪️ क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते छत्रपती शिवाजी महराज चौक
▪️ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बारामती चौक ( उपजिल्हा रुग्णालय )
▪️ छत्रपती शिवाजी महराज चौक ते भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक
▪️ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक
▪️ महावीर चौक ते उमाजी नाईक चौक ( मुधोजी हायस्कूल समोर )
▪️ महावीर चौक ते डेक्कन चौक
▪️ डेक्कन चौक ते महात्मा फुले चौक ( लाईफ लाईन हॉस्पिटल समोर )
▪️ महात्मा फुले चौक ते गजानन चौक
▪️ श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते शासकीय अधिकारगृह
▪️ शासकीय अधिकारगृह ते गिरवी नाका
▪️ फलटण शहरातील इतर उर्वरित ठिकाणे
खालील ठिकाणी वाहने पार्किंग करण्याची सुविधा नि:शुल्क करण्यात आलेली आहे.
▪️ नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या समोरील वाहनतळ
▪️ डेक्कन चौक येथील अशोका हॉटेल शेजारील नगरपालिका मालकीचे वाहनतळ
नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त बसल्याचे आढळून आल्यास सदर व्यापारी व शेतकरी यांचे विरुद्ध प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा देण्याबरोबरच नमूद केलेल्या ठिकाणीच दुचाकी, चारचाकी, सायकल तसेच अन्य प्रकारची वाहने पार्किंग करण्याचे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.