फलटण : एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था चर्चेची असतानाच आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास फलटण बारामती मार्गावर गणेश नगर (अलगुडेवाडी) ता. फलटण परिसरात एसटी बस ने चालू प्रवासात अचानक पेट घेतला. या बर्निंग थरारात बस जाळून खाक झाली असून कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी, फलटण बारामती मार्गावर एसटी महामंडळाची सीएनजी बस बारामतीहून फलटणकडे येत असताना दुपारी सव्वा तीनच्या सुमारास गणेश नगर परिसरात बसच्या पुढील भागातून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर चालकाने सदर बस थोडी बाजूला घेतली. त्याच दरम्यान बसमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आल्या नंतर, चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्व प्रवाशांना बसच्या खाली सुरक्षितरित्या उतरविले त्यानंतर बसने पेट घेतला व या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. या बस मध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करीत होते. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस व एसटी महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. परंतु अग्निशामक दलाची गाडी पोहोचली नव्हती.
या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था व प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांची गर्दी व वाहनांच्या रांगा असे दृश्य पहावयास मिळत आहे.